कोरोनाबाधितांना घेऊन आंदोलन करणार; बेड उपलब्‍ध नसल्‍याने नगरसेवकाचा इशारा

Dhule corporation
Dhule corporation

धुळे : कोरोनाबाधित रुग्णांना बेड, ऑक्सिजनची गरज असताना त्यांना रुग्णालयांमध्ये बेड मिळत नाही. दुसरीकडे, साडेसहाशे बेड शिल्लक असल्याच्या बातम्या येतात. मग हे शिल्लक बेड कुठे आहेत ते कुणीतरी सांगावे, बेड उपलब्धतेबाबतच्या व्यवस्थापनासाठी समिती गठित आहे. मग ही समिती कुठे आहे? असा प्रश्‍न करत याबाबत सुधारणा न झाल्यास कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा नगरसेवक अमीन पटेल यांनी गुरुवारी (ता.२५) महापालिकेच्या स्थायी समिती सभेत दिला. इतरही सदस्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासह बाधितांना उपचार मिळण्याबाबत आवश्‍यक उपाययोजना करण्याची मागणी केली. 
महापालिकेची स्थायी समिती साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात झाली. सभापती संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ, सदस्य अधिकारी उपस्थित होते. समाजवादी पक्षाचे सदस्य अमीन पटेल यांनी ऑक्सिजनची गरज असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येदेखील बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांची ससेहोलपट होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्धतेच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी समिती गठित करण्याची सूचना केली होती. ही समिती नेमकी कुठे आहे असा सवालही त्यांनी केला. 

म्‍हणूनच कोरोनाबाधितांसोबत आंदोलनाचा इशारा
कोरोनाबाधित रुग्णांना गरजेनुसार बेड उपलब्धतेचे व्यवस्थापन झाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. याप्रश्‍नी सुधारणा न झाल्यास कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करेन, असा इशाराही श्री. पटेल यांनी दिला. भाजपचे सदस्य नागसेन बोरसे म्हणाले, की एका खासगी हॉस्पिटल्समध्ये विचारणा केली असता ऑक्सिजनची गरज नसलेले रुग्ण पाठवा असे सांगितले गेले. त्यामुळे याबाबत योग्य नियोजन गरजेचे आहे. 

लॉकडाउनने काहीही साध्य नाही
होळी सणाला लॉकडाऊनची चर्चा आहे, मात्र लॉकडाऊनने काहीही साध्य होणार नाही असे म्हणत त्यांनी बाजारपेठेत दुकानदार, फेरीवाल्यांची कोरोना चाचणी करावी अशी मागणी केली. सदस्य शीतल नवले यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्या-त्या भागातील नगरसेवकांनी करावे, अल्पसंख्याक भागातील नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. 
 
दोन हजार टेस्टिंग करणार 
दरम्यान, कोरोनाच्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उपायुक्त गिरी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९० च्या आत असेल तरच आपण रुग्णाला हिरे मेडिकलला पाठवतो. ९० ते ९५ च्या दरम्यान ऑक्सिजन पातळी असेल तर शासनाच्या नियमानुसार आपण सिव्हीलमधील कक्षात रुग्णांवर उपचार करतो. आपल्याकडे एकूण ३१० बेड्स असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. शहरातील फेरीवाले तसेच बस स्थानकातील चालक - वाहकांचीही कोरोना चाचणी केली जाईल. एका दिवसात दोन हजार टेस्टिंग केल्या जातील असेही ते म्हणाले. 

संपादन - राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com