म्हणे, देशात चमकलो..स्वच्छतेत धुळ्याची शोकांतिका

धनराज माळी
Tuesday, 15 September 2020

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल लागला. यात धुळे शहराने चमकदार कामगिरी करून राज्यात दुसरा तर देशात नववा क्रमांक पटकाविला. ही किमया कशी साधली असा प्रश्‍न नंतर अनेकजणांना पडला खरा पण शहराचा नावलौकिक झाला हे महत्त्वाचे म्हणून या विषयावर पडदा पडला.

धुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये राज्यात दुसरा व देशात नवव्या क्रमांकावर चमकणाऱ्या धुळे शहरातील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. घराघरांतील कचरा संकलनाची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे. रस्ते, चौकांमध्येही घाणीचे साम्राज्य वाढत आहे, कचराकुंड्या फुल्ल झाल्या आहेत. अशी दयनीय स्थिती असताना अपवाद वगळता नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प आहेत आणि अधिकाऱ्यांनी तर डोळ्यांवर पट्टीच बांधली आहे. दुसरीकडे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पंतप्रधान पुरस्कारासाठी कागदी घोड्यांची पूर्तता सुरू आहे. त्यामुळे या स्थितीला काय म्हणावे असा प्रश्‍न आहे. 

नक्‍की वाचा- दोन्ही रूग्‍णालय मनपाचेच अहवाल मात्र वेगळे; म्‍हणून तो झाला बिनधास्‍त अन्‌ घडला हा प्रकार

२० ऑगस्टला स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल लागला. यात धुळे शहराने चमकदार कामगिरी करून राज्यात दुसरा तर देशात नववा क्रमांक पटकाविला. ही किमया कशी साधली असा प्रश्‍न नंतर अनेकजणांना पडला खरा पण शहराचा नावलौकिक झाला हे महत्त्वाचे म्हणून या विषयावर पडदा पडला. मात्र, सत्य लपून राहात नाही हेच खरे. हीच सत्य परिस्थिती सध्या धुळे शहराच्या विविध भागात पाहायला मिळत आहे. कचरा संकलनाचा बोजवारा तर उडालेलाच आहे, पण रस्ते, चौकदेखील आता घाणीच्या साम्राज्याने वेढले जात आहेत. त्यामुळे स्वच्छतेत आम्ही देशात चमकलो असे म्हणायचे कसे, असा प्रश्‍न उभा राहिला आहे. 

कचरा संकलनच ठप्प 
गेल्या काही दिवसांपासून शहरातील कचरा संकलनाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. प्रभागांमध्ये निम्म्याच घंटागाड्या फिरत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. काही भागांमध्ये तर आठ-आठ, दहा-दहा दिवस झाले घंटागाडी फिरकलेली नाही. त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत. रस्ते, चौक, गटारांमधील घाण, कचराकुंड्यांमधील कचरा उचलून नेण्यासाठी लावलेले ट्रॅक्टरही बंद असल्याने घाणीचे साम्राज्य वाढले आहे. 

नगरसेवकांची तोंडावर पट्टी 
प्रभागांमध्ये घंटागाडीच्या समस्या आहेत, घाणीचे साम्राज्य वाढले आहे, नागरिक तक्रारी करत आहेत. तरीही अपवाद वगळता नगरसेवक मूग गिळून बसले आहेत, तोंडावर पट्टी आहे. कुणाच्या धाकामुळे नगरसेवक शांत आहेत हा मात्र प्रश्‍न आहे. नगरसेवकांचा हा घाबरटपणा मनपातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. 

अधिकाऱ्यांचे तर डोळेच बंद 
स्वच्छतेत देशात, राज्यात नाव कमावल्यानंतर शहराची शान, इभ्रत कायम राहील यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांनी तत्पर, सजग राहणे गरजेचे होते. मात्र, घाणीचे साम्राज्य पसरले तरी हे अधिकारी जणू डोळ्यांवर पट्ट्य़ा बांधून बसले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान पुरस्कारासाठी कागदी घोडे नाचवत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation swach bharat abhiyan rank in india