कापूस खरेदी- विक्रीत राजकीय मंडळींचा अडसर 

संजय पि. पाटील
Sunday, 17 May 2020

राजकिय मंडळींचा अडसर ठरत असल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यास अडचण ठरत आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात असल्याचे गंभीर चित्र आहे.

धुळे ः शेतकऱ्यांकडे पडून असलेला कापूस खरेदीसाठी अगोदरच उशीर झाला आहे. उशीराने सुरू झालेल्या धुळे तालुक्‍यासाठी मोराणे प्र. लळिंग शिवारातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीत 12 मेपासून "सीसीआय'तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. यानंतर देखील राजकिय मंडळींचा अडसर ठरत असल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यास अडचण ठरत आहे. प्रामुख्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात असल्याचे गंभीर चित्र आहे. 

क्‍लिक करा - जळगाव जिल्ह्याच्या मृत्यूदरात घट

शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस घरात पडून आहे. या शिल्लक कापसाची "सीसीआय'तर्फे खरेदी करण्याची मागणी विविध स्तरांवर झाल्यानंतर शिंदखेडा तालुक्‍यात प्रारंभी तीन केंद्रे सुरू झाली. मात्र, धुळे तालुक्‍यासाठी केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप झाला. अखेर लोकप्रतिनधी, शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर मोराणे येथील जवाहर सूतगिरणीत कापूस खरेदी केंद्र 12 मेपासून सुरू झाले. या केंद्रावर कालपर्यंत (ता. 15) तीन दिवसांत एकूण 61 शेतकऱ्यांकडील दोन हजार 159 क्विंटल कापूस प्रतवारीनुसार खरेदी झाला. यात 14 मेस खरेदी बंद होती. सूतगिरणीत रोज सरासरी 20 ते 25 शेतकऱ्यांच्या वाहनांतील कापूस मोजला जात आहे. शासनाने 407 मेटॅडोर, ट्रॅक्‍टर अशा 35 ते 40 क्विंटल क्षमतेच्या वाहनांतील कापूस खरेदीचाच आदेश दिलेला आहे. मात्र, मोराणे येथे काही व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांकडील आयशर ट्रकसारख्या मोठ्या वाहनांतील म्हणजे तब्बल 80 क्विंटल कापूस खरेदी करून मोजण्याचा आग्रह काही राजकीय पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, त्यासाठी राजकीय दबावही आणला जात असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांमधूनच होत आहे. विशेष म्हणजे असे काही राजकीय पदाधिकारी दिवसभर सूतगिरणीजवळ ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे मोठा सावळा गोंधळ निर्माण होत आहे. या प्रकाराशी जवाहर सूतगिरणीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगण्यात येते. 

शेतकऱ्यांच्या प्रशासनाकडे तक्रारी 
या गैरप्रकाराबाबत काही शेतकऱ्यांकडून बाजार समिती, उपनिबंधक कार्यालयाकडेही तक्रारी करण्यात आल्या. मात्र, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून हात वर केले जात आहेत. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी असे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यवाही करण्याची नितांत गरज व्यक्त होत आहे. मात्र, तसे होत नसल्याने व मोठ्या वाहनांतून आणलेला कापूस मोजण्यासाठी दबाव आणला जात असल्याने लहान व गरजू शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त होत असून, याचा उद्रेक होण्याचीही भीती व्यक्त होत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास खरे, गरजू शेतकरी बाजूला पडून व्यापारी, मोठ्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी होईल. मग अन्य शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी कधी संधी मिळणार, हा खरा प्रश्‍न आहे. यात आता जिल्हाधिकाऱ्यांसह सहकार विभागानेच लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे. 

साडेतीन हजारावर शेतकऱ्यांची नोंदणी 
मोराणे येथील जवाहर सूतगिरणीत 12 मेपासून सुरू झालेल्या "सीसीआय'च्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आतापर्यंत तालुक्‍यातील सरासरी 3838 शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यात कालपर्यंत 61 शेतकऱ्यांकडील 2159 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यात प्रतवारीनुसार व आर्द्रतेचे प्रमाण तपासून शेतकऱ्यांना सरासरी 5200 ते 5355 रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule cotton cci center political leader