धुळ्यात प्रबोधनासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार उतरले रस्त्यावर  !

निखील सुर्यवंशी
Thursday, 27 August 2020

राज्य शासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

धुळे : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मी या आजारातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहे. प्रत्येक नागरिकाने संसर्गजन्य कोरोना विषाणूचे गांभीर्य जाणून घेत प्रतिबंधासाठी नियमितपणे मास्क वापरावा, अनावश्यक गर्दी टाळावी आणि शारीरिक अंतर पाळावे, असे आवाहन पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. 

पालकमंत्री सत्तार दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर होते. यात त्यांनी धुळे शहरातील प्रमुख चौकात प्रबोधन करत नागरिकांशी संवाद साधला. तिरंगा चौक, महात्मा गांधी पुतळा, शंभर फुटी रोड, देवपूरमधील दत्तमंदिर परिसरात अनेकांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारूक शाह, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत ठाकरे, नरेंद्र कुळकर्णी आदी उपस्थित होते. पालकमंत्री सत्तार म्हणाले, की कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यास लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. थेट नागरिकांशी संवाद होण्यासाठी प्रमुख चौकात आलो. या आजारावर अद्याप खात्रीशीर लस उपलब्ध नाही. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने आपला परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. 

हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझर लावावे.या प्रयत्नांना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. विविध सण, उत्सव नियमांचे पालन करीत साजरे करावेत. आमदार गावित, आमदार शाह यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी यादव यांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलिस अधीक्षक पंडित यांनी बंदोबस्ताची, तर आयुक्त शेख यांनी उपाययोजनांची माहिती दिली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Dhule Guardian Minister Abdul Sattar started conducting Corona public awareness among the citizens