
पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात आज दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर चारच्या वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात बोराच्या आकाराची गार पडायला सुरवात झाली.
वार्सा : पिंपळनेरच्या पश्चिमपट्टयात आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटीने तडाखा दिला. बोरांच्या आकाराची गार पडल्याने घरांचे नुकसान झाले, झाडे उन्मळुन पडली. डांगरमळ्यांसह भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, वार्सा फाटा (ता. साक्री) येथे घराची भिंत अंगावर पडल्याने एका 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यूही झाला.
पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात आज दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर चारच्या वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात बोराच्या आकाराची गार पडायला सुरवात झाली. जोरदार वादळामुळे घरांचे, कायद्यांच्या चाळीचे पत्रे उडून गेले. वादळाचा तडाखा एवढा जोरदार होता की अनेकांच्या घरांच्या भिंती पडल्या,अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रेही लांबपर्यंत उडून गेले. अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडले. नवापुर ते पिंपळनेर रस्त्यावर आंबापाडा ते वार्साफाटा दरम्यान निलगिरीचे दहा ते बारा मोठ वृक्ष रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. काही छोटी वाहने रामपुरामार्गे कुडाशी वरून जातांना दिसली.
भाजीपाला पिकांचे नुकसान
पाऊस आणि गारपीटीमुळे काद्यांचे मोठे नुकसान झाले असून, ब-याच शेतकऱ्यांचे डांगर मळे तसेच कारले, गिलके, दोडके आदी भाजीपाला पिकेदेखील भुसपाट झाली. कांदा चाळीवरील पत्रे उडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचा चाळीत साठवलेला कांदाही ओला झाला.
भिंत पडल्याने एकाचा मृत्यू
वार्सा फाटा (ता. साक्री) येथे एतवारी साव (वय- 42, मु. मोहगाव ता. साक्री) यांचा अंगावर घराची भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. ज्या घरांची भिंत पडली त्या घरात तीन भाऊ होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने घराचे प्रथम पत्रे उडाले तसे दोन भाऊ बाहेर पळाले एतवारी साव हे वादळी पावसापासुन बचावासाठी भिंतीच्या आड लपले होते. पावसाचा जोर व वादळामुळे भिंत कोसळली त्यातच ते गतप्राण झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. मृत एतवारी साव हे मूळ झारखंडचे होते मात्र, गेल्या 10 ते 12 वर्षांपासून मोहगाव (ता. साक्री) येथे राहत होते. सध्या ते वार्सा फाटा (ता. साक्री) भाड्याच्या घरात वास्तव्याला होते.