esakal | धुळे जिल्ह्यातील उन्हाळ कांदा थेट नागपूरच्या बाजारात
sakal

बोलून बातमी शोधा

onion

धुळे जिल्ह्यातील उन्हाळ कांदा थेट नागपूरच्या बाजारात

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या काढणीला वेग आला आहे. खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने विहिरी व कुपनलिकांची वाढलेली पाणी पातळीमुळे कांद्याचे क्षेत्र अधिक वाढलेले आहे. लाॅकडाऊनमुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. नागपूर बाजारात प्रती क्विंटल आठशे ते हजारपर्यंतचा भाव मिळत आहे. परीणामी धुळे तालुक्यातील कांदा थेट नागपूरच्या बाजारात भाव खात आहे.

हेही वाचा: खानदेशात यंदा साडे बारा लाख क्विंटल साखरचे उत्पादन !

धुळे तालुक्यात कापडणे, नंदाणे, बोरीस, लामकानी, कुसुंबा नेर, आर्वी, मुकटी, अंचाळे परिसरात कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. यावर्षी उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कांद्याचे काढणीस वेग आला आहे. काढणीसाठी मजुरांची चणचण भासत आहे. पहाटेपासूनच महिला मजूर शेतात पोहोचत आहेत. नऊ वाजेपर्यंत काढणी सुरू असते.

चार हजारी कांदा हजारावर

महिनाभरापूर्वी कांद्याचा प्रती क्विंटल दर तीन हजार पेक्षा अधिक होता. यावर्षी कांद्याला चांगला भाव मिळेल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कांदा काढण्यास वेग दिला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच कांद्याचे भाव दोन हजाराच्या आत आलेत. त्यानंतर लॉकडाउन लागणार असल्याची चर्चा सुरू झाली. भाव हजारापर्यंत पोहचले. सध्या खडक लॉक डाऊन सुरू आहे. स्थानिक बाजार बंद आहेत. आठवडे बाजार बंद आहे. यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. नागपूरच्या बाजारात कांदा नेला जात आहे. तिथे हजारापर्यंत भाव मिळतोय. खर्च काढून शेतकऱ्यांना केवळ मजुरीच निघत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा: नो टेंशन.. लॉकडाऊनमध्ये बँकेतील पैसेही मिळणार घरपोच

कांदा नेहमीच करतो वांदा

तालुक्यात कांद्याचे उत्पादन घेण्यात शेतकरी माहीर आहेत. कांद्याला काही भाव मिळो. तरीही ते कांद्याची लागवड करीत असतात. कांद्याचे उत्पादन घेणे. हा त्यांचा छंद झाला आहे. कांदा नेहमीच वांदा करीत असतो. तरीही केव्हातरी भाव मिळेल. मागील सर्व कसर निघून जाईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत असते.

भाव वाढण्याची अपेक्षा

राज्यात कांद्याला हमी भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून नेहमीच व्यक्त होत असते. मात्र हमीभाव देण्यापेक्षा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख शशिकांत भदाणे, माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, शांतूभाई पटेल आदींनी केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे