निवडणूक अन्‌ अपप्रकार यांचे सख्य पूर्वीपासून : ऍड. जी. व्ही. गुजराथी

निवडणूक अन्‌ अपप्रकार यांचे सख्य पूर्वीपासून : ऍड. जी. व्ही. गुजराथी

धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची स्थित्यंतरे 1961 पासून पाहिली, अनुभवली आहेत. राज्यात जेव्हा पालिका अस्तित्वात आल्या आणि त्यासाठीच्या निवडणुकांना सुरवात झाली, त्या वेळेपासून त्यातील व्यंग आणि त्यांचे विडंबन चवीने चघळले जात असे. "उलटीपालटी' या मराठी नाटकाचे प्रयोगही होत होते. त्यातील मूळ भूमिका आणि आजची परिस्थिती यातील फरक प्रकारांचा थोडा आणि प्रमाणाचाच जास्त आहे. 

को णतीही निवडणूक म्हटली, की स्पर्धा आली. स्पर्धा आली की "तू की मी' ही चढाओढ आली. तशी चढाओढ सुरू झाली, की त्या पाठोपाठ आरोप- प्रत्यारोप आलेच. काही खरे- काही खोटे. कोणते खरे आणि कोणते खोटे हे नागरिकांनी आपापल्या माहितीप्रमाणेच, इतकेच नव्हेतर आपापल्या आवडीनिवडी, इच्छेप्रमाणे ठरवायचे. हा मानवी स्वभाव आहे. 
त्या- त्या शहरातील स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिःसारण, प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा यांच्या व्यवस्थेत पक्षीय राजकारण नसावेच. मतभेद वेगळा आणि मारामारी वेगळी. त्या मतभेदांचे निराकरण आपसांत चर्चेने व्हावे. पण ही सारी तात्त्विक संकल्पना. प्रत्यक्षात अनेक प्रकाराचे स्वार्थ गुंतलेले असतात. नगरविकास योजना कायद्याचाही उपयोग नगरविकासाच्या नावाने आपल्या विरोधकांच्या मिळकतींवर आरक्षणे टाकण्यासाठी सर्वत्र केला जातो. पालिकाच नव्हे तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्येही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप असतो. 
हे बदलले पाहिजे. त्यासाठी सर्वसाधारण मतदानाचे विचार बदलले पाहिजेत. अधिकारापेक्षा जबाबदारी, कर्तव्य, दायित्व यांच्यावर भर दिला पाहिजे, ही भावना वाढली पाहिजे. आज चित्र भेसूर दिसते आहे. पण तो स्थित्यंतराचा एक टप्पा आहे. हे चित्र नक्‍कीच बदलेल आणि त्याची सुरवात या आपल्या भारतातून होईल. ही माझी श्रद्धा, समाजाच्या अनुभवातून आणि सामाजिक शास्त्रांच्या तसेच मानसशास्त्राच्या अभ्यासातून आलेली. 


दादागिरी अन्‌ निवडणुका हे समीकरण 
आजही हेच सारे विचार, हे सारे प्रश्‍न आहेतच. त्यात भर पडली आहे ती फक्‍त एका प्रकाराची. ती म्हणजे बाहुबलाची. मसल पॉवरची, दादागिरीच्या सक्‍तीची. 1961 पासूनही दादागिरी संबंधीचे आरोप होतच होते. आता त्या आरोपांच्या संख्येमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे आणि आता, "असुदे रे तो कसाही, आपली कामे करेल ना, झाले तर! उलट तसा असेल तर आपली कामे लवकर होतील, जास्त होतील.' असाही दृष्टिकोन स्वीकारला जातो. मतांसाठी दमदाटी, पैशांचा भ्रष्टाचार, हे प्रकार तर मतांवर आधारलेली लोकशाही सुरू झाली ना, थेट तेव्हापासूनचे आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com