esakal | धुळे ः विश्‍वविख्यात शल्यचिकित्सक रवींद्रनाथ टोणगावकर यांचे कोरोनामूळे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे ः विश्‍वविख्यात शल्यचिकित्सक रवींद्रनाथ टोणगावकर यांचे कोरोनामूळे निधन

हर्नियावर मूलभूत संशोधन करणाऱ्या जगातील 47 व्यक्तींच्या यादीत दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचा समावेश झाला.

धुळे ः विश्‍वविख्यात शल्यचिकित्सक रवींद्रनाथ टोणगावकर यांचे कोरोनामूळे निधन

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः दोंडाईचा शहरासह धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर नेणारे डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचे कोरोनाशी मुकाबला करताना नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. ते शारीरिक तंदुरुस्त असल्याने शतायुषी होतील, असे अनेकांना ठाऊक होते. मात्र, कोरोनाने त्यांच्यावर झ़डप घातली. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच वैद्यकीय, राजकीय सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.

डॉ. टोणगावकर अनेक वर्षे असोसिएशन ऑफ रूरल सर्जन ऑफ इंडिया संस्थेचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष, तर इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रूरल सर्जन या तेरा देशांचा सहभाग असलेल्या संस्थेचे जागतिक अध्यक्ष होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष, तर अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले होते. त्यांनी हर्नियाची जाळी शोधली. त्याचा वापर आणि उपयुक्तता जगप्रसिद्ध केली. सामान्य जनतेसाठी नावीन्यपूर्ण शोध लावून ती जाळी अत्यल्पदरात उपलब्ध केली. त्यामुळे दोंडाईच्याचे नाव जगाच्या नकाशावर आणले. ऑपरेशनसाठी ग्रामीण भागातील रुग्णासाठी रक्तपेढीला रुग्णालयात मान्यता मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टात त्यांचा शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा सुरू होता. परिसरातील जनतेला अल्पदरात शस्त्रक्रिया करून त्यांनी सहकार्य केले. रोटरी क्‍लबच्या माध्यमातून नानासाहेब टोणगावकर वाचनालय, मंदाकिनी रोटरी इंग्लिश स्कूलसह अनेक संस्थांचे पदाधिकारी होते.

स्वित्झर्लंडमधील "स्प्रिंजर' या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या मॅनेजमेण्ट ऑफ ऍबडॉमीनल हर्नियाज' (Management of Abdominal Hernia's) या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीत हर्नियावर मूलभूत संशोधन करणाऱ्या जगातील 47 व्यक्तींच्या यादीत दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर यांचा समावेश झाला. या यादीत भारतातील ते एकमेव डॉक्‍टर होते. त्यांच्या रूपाने धुळे जिल्ह्याची कीर्ती पुन्हा सातासमुद्रापार गेली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली होती. कोरोनाची लागण होण्यापूर्वी ते पुस्तक लिखाणासह १६ तास वैद्यकीय सेवेत गर्क होते. त्यांच्यामागे पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई टोणगावकार, मुलगा डॉ. राजेश, आयटी इंजिनिअर राहुल, मुलगी वास्तुतज्ज्ञ राजश्री दंडवते, सून डॉ. ज्योत्स्ना आहेत. डॉ. रवींद्र टोणगावकर यांच्या निधनामुळे खानदेशचा, देशाचा देवदूत हरपला, अशा शब्दात त्यांना माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी श्रद्धांजली वाहिली.

loading image
go to top