धुळ्यात कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगामुळे शेतकरी हैराण 

रविंद्र देवरे
Saturday, 19 September 2020

शेतकऱ्यांना महागड्या औषधीने घायळ केले. त्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच थ्रीप्स व फुलकिड्याचे कपाशी पिकावर आक्रमण झाले.

धामणगाव : सध्या संपूर्ण तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला या पावसामुळे तरी काही प्रमाणात थ्रीप्स व फुलकिडे नियंत्रणात आली आहेत. या तालुक्यातील शेतकरी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतो. मात्र त्यासाठी या पिकाची काळजी घेण्यास कोणतीही कमतरता ठेवत नाही. भरमसाठ खर्च करून हे उत्पादन घेतले जात असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादन घटत आहे. त्यामुळे येथील शेतकरी सद्या मेटाकुटीस आला आहे.

आवश्यक वाचा ः खडसे शिवसेनेत येण्याचा विषय गुलाबराव बघून घेतील !

आज रोजी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या सदृश रोगाचे आक्रमण झाले आहे. पाने लाल होत असून ती करपत आहेत.
धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी हे मुख्य असून दर्जेदार कापसामुळे शिरुड निमगुळ बोरकुंड धामणगाव या परिसराला संपूर्ण तालुक्यातील एक वेगळी ओळख मिळाली आहे. उत्कृष्ट कपाशी उत्पादक म्हणून प्रसिध्द असलेल्या या भागातील लांब धाग्याच्या कापसामुळे भावातही नेहमी तेजी राहत असते.या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने कपाशीच्या पेऱ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र नंतर ठराविक कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने या पिकाची पाहिजे ती वाढ होऊ शकली नाही.
 

त्यातच सुरवातीला मावा व तुडतुडयांनी हल्लाबोल केल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधीने घायळ केले. त्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच थ्रीप्स व फुलकिड्याचे कपाशी पिकावर आक्रमण झाले. त्यासाठीही वेगवेगळ्या शिफारस केलेल्या औषधीचा फवारा करूनही त्यातूनही पाहिजे ते रिझल्ट मिळाले नाही

 

वाचा ः शासकीय निवासाची सोय नसल्याने पोलिसांना खासगी खोली घेण्याची आली वेळ !
 

रासायनिक कीटकनाशक कम्पन्याच्या वाढलेल्या स्पर्धेमुळे नेमके कोणते किटकनाशक फवारावे याबाबतही शेतकरी अनभिज्ञ आहे. त्यातच कृषिकेंद्रधारक त्यांना अधिक नफा मिळतो तीच औषधी शेतकऱ्यांच्या मस्तकी सद्या मारत आहे. एकंदरीत या भागातील शेतकऱ्यांचे कपाशी हे पीक लाल्यासदृश रोगाने ग्रास असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. यासाठी संबंधित विभागाने या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Farmers are suffering due to reddish disease on cotton crop