शेतकऱ्यांवर का आली आपल्या सर्जा-राजाला विकण्याची वेळ, कारण जाणायचे, तर मग वाचा !

निखील सुर्यवंशी
Wednesday, 16 September 2020

आठ महिने रोजचा खर्च पेलणे शक्य नसल्याने काही शेतकऱ्यांनी पाच ते दहा हजाराची घट स्वीकारून बैलजोडींची विक्री केली.

 धुळे ः शेतीचा हंगाम आटोपत असल्याने आणि खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल विक्रीस आणले. त्यामुळे गर्दी उसळली. यात कोरोनाच्या संकटकाळात असंख्य जणांनी शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर टाळला. काम संपले की बैलजोडी विक्रीचा `ट्रेंड` शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. 

पावसाळा संपण्यात आहे. शेतीची मशागत झालेली आहे. मूग, उडीदची काढणी होत असून बाजरीचा हंगाम आटोपण्याच्या बेतात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत बैल विक्रीस आणले. काहींनी बैलजोडी आणली. 

भाडे हजार रुपये रोज 
शेतीच्या हंगामात चार महिने बैलजोडीचा वापर केला जातो. काही शेतकरी बैलजोडी भाड्याने घेतात. त्याचा दिवसाला दर सरासरी ८०० ते १२०० रुपयांपर्यंत असतो. बैलजोडी आणि एक व्यक्ती, अशाला भाडेदर असतो. ज्यांच्या मालकीची बैलजोडी असते. त्यांना दिवसाला बैलजोडीसाठी सरासरी दीडशे ते दोनशे रुपयांचा खर्च येतो. यात चारा, ढेप दिली जाते. 

आठ महिने काय करणार? 
चार महिने बैलजोडीचे काम झाल्याने त्यांच्यावर उर्वरित आठ महिने खर्च करणे शक्य नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी बैलजोडी विक्रीसाठी आणली. यात धुळे, नंदुरबार, जळगाव, सोलापूर, पंढरपूर, मध्य प्रदेश आदी विविध ठिकाणाहून येथील बाजार समितीत मंगळवारच्या जनावरांच्या बाजारानिमित्त गर्दी उसळली. 

६५ हजाराची जोडी 
बाजारात सरासरी २५ ते ३० हजाराच्या जोडीपासून सर्वाधिक सरासरी ६५ हजाराला बैलजोडी विक्रीस गेली. शंभराहून अधिक बैल आणि जोडींची विक्री झाल्याने समितीत लाखोंची उलाढाल झाली. सायंकाळनंतरही समिती व्यवस्थापन खरेदी- विक्रीच्या व्यवहारातील ताळमेळ बसविण्यात गुंतले होते. 
 

खरेदीदार कोण? 
ऊसतोड कामगारांसाठी संबंधित ठेकेदारांनी आणि सधन शेतकऱ्यांनी कमी- अधिक किमतीत बैलजोडींची खरेदी केली. आठ महिने रोजचा खर्च पेलणे शक्य नसल्याने काही शेतकऱ्यांनी पाच ते दहा हजाराची घट स्वीकारून बैलजोडींची विक्री केली. ऊसतोड कामगारांच्या वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो. संबंधित कामगारांना मिळणाऱ्या वेतनातून ठेकेदार बैलजोडीची रक्कम स्वीकारतो किंवा बैलजोडी परत घेतो. या सर्व स्थितीत काम संपले की बैलजोडी विक्रीचा `ट्रेंड` निर्माण झाल्याची माहिती तरुण शेतकरी शशिकांत काटे यांनी `सकाळ`शी बोलताना दिली. 

उलाढालीचा आलेख वाढता 
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर सभापती सुभाष देवरे यांच्या कार्यकाळात उलाढालीचा आलेख वाढता आहे. समितीही आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आली. कोरोनाच्या संकटकाळात समितीही सापडली आहे. मात्र, शासनाच्या सूचनांचे पालन करत आर्थिक उलाढाल वाढीसाठी समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Farmers have to sell their oxen and the cattle market is crowded