esakal | फ्रेंडशीप डे ला...दोघा मित्रांचा लळिंग तलावात बुडून दुदैवी मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

फ्रेंडशीप डे ला...दोघा मित्रांचा लळिंग तलावात बुडून दुदैवी मृत्यू 

दहावीच्या निकालानंतर जवळील निसर्गरम्य भागात शहरातील हे पाचही युवक फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पाच युवकांपैकी दोघांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

फ्रेंडशीप डे ला...दोघा मित्रांचा लळिंग तलावात बुडून दुदैवी मृत्यू 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

 
धुळे/कापडणे  : लळिंग (ता. धुळे) येथील दगडी नाला या गावतलावात बुडून धुळे शहरातील मौलवीगंज भागात राहणाऱ्या हाकीम मोहम्मद (वय १६) व अरबाज खान मुसा खान (१७) या दोघा अल्पवयीन युवकांचा रविवारी (ता. २) मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह रात्री आठच्या सुमारास सापडल्यानंतर विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसांपूर्वी लागलेल्या दहावीच्या निकालात दोघेही उत्तीर्ण झाले होते. दरम्यान, त्यांच्या अन्य तीन मित्रांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात उतरलेच नाहीत. त्यामुळे ते वाचले. 

धुळे शहरालगत लळिंग येथील दगडी नाला या गावतलावाचे पात्र मोठे, तसेच समतल नसल्याने शोधकार्यात मोठी अडचण आली. शोधमोहिमेच्या दरम्यानच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शोध घेण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. तरीही शोध जोमाने सुरू होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन तासांनंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. 


दहावीच्या निकालानंतर जवळील निसर्गरम्य भागात शहरातील हे पाचही युवक फेरफटका मारण्यासाठी गेले होते. पाच युवकांपैकी दोघांना तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. यातील एक युवक तलावात पोहण्यासाठी उतरला मात्र, काही कळण्याच्या आतच तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या एका युवकाचाही बुडून मृत्यू झाला. इतर तिघे मित्र पोहण्यासाठी तलावात न उतरल्याने वाचले. दरम्यान, घटना कळताच मोहाडी उपनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या दोघा युवकांना शोधण्यात पोलिसांना यश आले.