बोगस डॉक्‍टरांचे धाबे दणाणले 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

धुळे/शिरपूर ः बोगस डॉक्‍टर प्रकरणी येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत आहेत. यात वैद्यकीय पथकाने आज शिरपूर तालुक्‍यातील मालकातर, बोराडी, कोडीद येथे कारवाई केली. अन्य तीन ठिकाणी कारवाईची कुणकूण लागताच बोगस डॉक्‍टर फरार झाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सरासरी 25 ते 30 बोगस डॉक्‍टरांवर कारवाई झाली आहे. 

धुळे/शिरपूर ः बोगस डॉक्‍टर प्रकरणी येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत आहेत. यात वैद्यकीय पथकाने आज शिरपूर तालुक्‍यातील मालकातर, बोराडी, कोडीद येथे कारवाई केली. अन्य तीन ठिकाणी कारवाईची कुणकूण लागताच बोगस डॉक्‍टर फरार झाले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सरासरी 25 ते 30 बोगस डॉक्‍टरांवर कारवाई झाली आहे. 
जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या आदेशाने, तर मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. शिवचंद्र सांगळे व वैद्यकीय पथकाने ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बोगस डॉक्‍टरांचे धाबे दणाणले आहे. 

ठिकठिकाणी कारवाई 
पथकाने आतापर्यंत साक्री तालुक्‍यातील छडवेल, दहिवेल, कुडाशी, रोहोड, सुकापूर, नवापाडा, ब्राह्मणवेल, पिंजारझाडी, जैताणे, धुळे तालुक्‍यात वार- कुंडाणे, बोरकुंड, मोघण, शिरपूर तालुक्‍यात कोडीद, पळासनेर, सांगवी, मालकातर, बोराडी आदी ठिकाणी बोगस डॉक्‍टरांवर कारवाई केली आहे. 

कारवाईचे कारण काय? 
परवानगी नसताना इलेक्‍ट्रोपॅथीच्या नावाखाली वैद्यकीय व्यवसाय करणे आणि वैद्यकीय पदवी नसताना व्यवसाय करणे, अशा दोन कारणांमुळे बोगस डॉक्‍टरांवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणी त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण सील करणे, त्यांच्यासह घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जात आहे. काही बोगस डॉक्‍टर "स्टेरॉईड'ची विक्री करणे, त्याचा वापर करणे, "आयसीयू'मधील औषधांचा सर्रास वापर करणे आदी गंभीर प्रकार करत आहेत. कारवाईच्या ठिकाणी आढळलेला औषधांचा साठाही जप्त केला जात आहे. 

शिरपूर तालुक्‍याकडे मोर्चा 
वैद्यकीय पथकाने कारवाईसाठी आज शिरपूर तालुक्‍याकडे मोर्चा वळविला. यात मालकातर येथे डॉ. जयंत विश्‍वास, बोराडी येथे डॉ. दीपक बडगुजर यांचे व्यवसायाचे ठिकाण सील करण्यात आले. कोडीद येथे डॉ. ताजुद्दीन शेख यांच्या घरीच दवाखाना असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, पुढील योग्य ती कारवाई सुरू आहे. तत्पूर्वी, पळासनेर येथे डॉ. ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसन्न कुळकर्णी यांनी कारवाई केली. 

तिघे बोगस डॉक्‍टर फरार 
वैद्यकीय पथकाने शिरपूर तालुक्‍यात वाडी, नांदर्डे, कुवे येथे बोगस डॉक्‍टरांवर कारवाईचे नियोजन केले होते. त्याची कुणकूण संबंधितांना लागल्याने ते फरार झाले. 

स्थानिक व बंगालींचा समावेश 
बोगस डॉक्‍टरांमध्ये स्थानिक व बंगालींचा "फिफ्टी- फिफ्टी' प्रमाणात समावेश आहे. आतापर्यंत 25 ते 30 जणांवर झालेल्या कारवाईत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उर्वरित काही बोगस डॉक्‍टरांवर पूर्वीच गुन्हा दाखल झालेला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule froad docter racket