गॅसने भरलेल्‍या टँकरचा व्हॉल्‍वचे सिल तोडून करायचे रिस्‍की काम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

टँकरच्या तीनपैकी मधल्या व्हॉल्व्हचे सील तोडले. लोखंडी पाइपाच्या मदतीने सिलिंडरमध्ये गॅस भरत होते.

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील अजंग (ता. धुळे) शिवारात एका हॉटेलमागे टँकरमधून घरगुती गॅस सिलिंडर भरण्याचा गैरउद्योग सुरू होता. तो धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पथकाने उद्‌ध्वस्त केला. या कारवाईबद्दल श्री. गांगुर्डे यांच्यासह पथकाच्या कामगिरीची प्रशंसा करत पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी अवैध व्यवसाय मोडीत काढू, असा संकल्प पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 
 
अजंग शिवारात पोलिसपथकाने ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच देवपूर भागातील संशयितासह तिघांना अटक केली. फरारी झालेल्या एकाचा शोध सुरू आहे. टँकरमधून घरगुती सिलिंडर भरण्याच्या गैरउद्योगाची माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक गांगुर्डे, उपनिरीक्षक सागर काळे, हवालदार राजेंद्र मोरे, अन्वर पठाण, पोलिस नाईक प्रवीण पाटील, किशोर खैरनार, चेतन चव्हाण, हवालदार सांगळे, राकेश महाले, देसले, भावसार आणि तालुका पुरवठा अधिकारी छोटू चौधरी यांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यांनी शुक्रवारी पहाटे साडेतीनला ही कारवाई केली. 
संशयित भरत चौधरी (वय ४५, रा. शिवाजीनगर, प्लॉट नं. ९५, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे), पारस जैन (२८, रा. योगेश्वर कॉलनी, दहिवेल, पारोळा, जि. जळगाव), नरेंद्र हिवराळे (३२, रा. नवानगर, बाळापूर, जि. अकोला) हे तीन संशयित गॅस टँकरमधून (एमएच ४, जेके २१२९) घरगुती सिलिंडर भरताना आढळले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. टँकरचालक राहुल दाभाडे (रा. टेंभुर्णा, ता. खामगाव, जि. बुलडाणा) फरारी झाला. संशयितांनी टँकरच्या तीनपैकी मधल्या व्हॉल्व्हचे सील तोडले. लोखंडी पाइपाच्या मदतीने सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. यात पोलिसपथकाने ३० लाख २८ हजार ६९२ रुपयांचा टँकर, पाच हजारांचा लोखंडी पाइप, १४ हजार ५०० रुपयांचे दहा रिकामे सिलिंडर, १७ हजारांचे कमर्शिअल वापराचे दहा आणि ४७ हजार ५०० रुपयांचे १९ सिलिंडर, असा ३१ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईची पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule gas cylinder full in trancor police action