
वय झाल्याने पणजीचा (आजी) मृत्यू झाला. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी सारे नातेवाईक देखील जमले होते. अंत्यसंस्काराची तयारीच सुरू होती आणि तितक्यात कुटूंबावर आणखी एक आघात झाला.
म्हसदी (धुळे) : गावातील तरुण शेतकऱ्याला सकाळी ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. रात्री पणजीच्या निधनानंतर सकाळी पणतुचे अकाली निधन झाल्याने कुटूंब अधिकच दुःखात बुडाले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गावातील युवा शेतकरी किशूअप्पा उर्फ किशोर जयवंत भदाणे (वय 49) यांचे आज सकाळी सातला ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. घरातील करता तरुण गेल्याने कुटुंबातील सदस्यांनी धसका घेतला आहे. किशोर यांच्या पणजी रुखमाबाई भदाणे यांचे गुरूवारी रात्री वृध्दपकाळाने निधन झाले. आज सकाळी रूखमाबाई यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पणतू किशोर हे देखील अंत्यसंस्काराच्या तयारीत लागले होते. तयारी सुरू असताना किशोर यांना छातीत कळ आली. घरी पोहचल्यावर त्यांचे निधन झाले. घरातील कमवती व्यक्ती गेल्यावर कुटुंब हतबल असून, त्यांच्या निधनाने वृद्ध आई, पत्नी आणि मुलांनी एकच आक्रोश केला.
आई- पत्नीची हरपली शुद्ध
गावातील शेकडो युवकांचा जिवलग मित्र गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. बसस्थानकावरील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवत श्रद्धांजली वाहिली. डोळ्यासमोर लहान मुलाच्या निधनामुळे वृद्ध आई व पत्नीची काही काळ शुध्द हरपली. सायंकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे