मध्यरात्रीची घटना; जेवणाच्या बिलावरून दे दणादण

विजयसिंग गिरासे
Monday, 14 September 2020

रात्री दराणे फाट्यावरील हॉटेल साई श्रद्धामध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर बिलाचे पैसे देण्यासाठी काऊंटरवर गेले असता महेश धनगर याने पैसे देण्याच्या कारणातून हाता-बुक्क्यांनी माझ्या तोडावर मारहाण करायला सुरवात केली.

चिमठाणे (धुळे) : सोनगीर- दोंडाईचा राज्य महामार्गावरील दराणे (ता. शिंदखेडा) फाट्याजवळील हॉटेल साई श्रद्धामध्ये रविवारी (१३ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास रोहाणे (ता. शिंदखेडा) येथील दोन तरुण व हॉटेलमालक यांच्यात बिलावरून वाद झाला. त्यात रोहाणे येथील तरुणांना लोखंडी रॉड व हाता-बुक्क्याने मारहाण झाली. त्यात ते जखमी झाले. यासंदर्भात हॉटेलमालकासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

नक्‍की वाचा- दोन्ही रूग्‍णालय मनपाचेच अहवाल मात्र वेगळे; म्‍हणून तो झाला बिनधास्‍त अन्‌ घडला हा प्रकार

रोहाणे येथील लीलाधर प्रकाश वाघ (वय २४, व्यवसाय शेती) याने शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी व मित्र भूषण शिवाजी पाटील (रा. रोहाणे) रविवारी रात्री दराणे फाट्यावरील हॉटेल साई श्रद्धामध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर बिलाचे पैसे देण्यासाठी काऊंटरवर गेले असता महेश धनगर याने पैसे देण्याच्या कारणातून हाता-बुक्क्यांनी माझ्या तोडावर मारहाण करायला सुरवात केली. त्यांनतर मला शिवीगाळ करून तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याचा भाऊ योगेश धनगर हाही तेथे आला. त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्याने लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केली. त्यामुळे पाठीला मुकामार लागला. 

हेपण वाचा- येथे झाला ना ‘अंडे का फंडा’; ऑनलाईन त्रिकुट आणि शेतकरी यांच्यातले काय आहे प्रकरण
 

मित्राला आवात दिला तर
भांडण सुरू असताना भूषण पाटीलला आवाज देत मला वाचव, असे म्हणत असतानाच महेश धनगरचे वडील रवींद्र भोमा धनगर हा प्लटिस्टक पाइप घेऊन आला व पाठीवर, हाता-पायांवर मारहाण केली. त्यावेळी मित्र भूषण आमच्यातील भांडण सोडविण्यासाठी आला असता भूषणलाही तोंडावरही मारहाण केली. त्यावेळी महेशने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने भूषणला पोटावर, पाठीवर मारहाण करून ‘तुला सोडणार नाही’, अशी धमकी दिली. त्यानंतर कोणीतरी आमच्या गावात फोन करून सांगितले. 

ग्रामस्‍थांनी नेले रूग्‍णालयात
सदर भांडणाचा प्रकार माहित होताच गावातील चंद्रकांत रोहिदास पाटील, भूषण विलास शिदे, सागर प्रकाश वाघ यांनी मला व भूषणला औषधोपचारासाठी खासगी वाहनाने चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे उपचार करून शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हॉटेलमालक रवींद्र भोमा धनगर, मुले महेश धनगर व योगेश धनगर सर्व (रा. दराणे) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे दूरक्षेत्राचे हवालदार रवींद्र माळी तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule highway hotel bill issue and two boy heating late night