esakal | धुळ्यात कोरोना व्हायरस टेस्ट लॅब सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

corona lab

चार कोटींचा निधी 
"कोरोना'च्या प्रतिबंधासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून औषधे व अत्यावश्‍यक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच आणखी मदत लागली, तर राज्य शासन मदत देईल. 
- अब्दुल सत्तार, पालकमंत्री, धुळे जिल्हा 

धुळ्यात कोरोना व्हायरस टेस्ट लॅब सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हायरल रिसर्च ऍण्ड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरी) "कोरोना व्हायरस'संबंधी तपासणीस सुरवात झाली. पहिल्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी झाली. "कोरोना' विषाणूची तपासणी करणारी उत्तर महाराष्ट्रातील ही पहिली प्रयोगशाळा ठरली आहे. 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या साथीचे आजार आणि नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे स्थापन करण्याच्या योजनेंतर्गत धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात या प्रयोगशाळेची स्थापना झाली. यात प्राथमिक सोयीसुविधा, यंत्रसामग्रीची उपलब्धता व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1.8 कोटींचा निधी मंजूर झाला. प्रयोगशाळेसाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात दोनशे स्क्वेअर मीटर जागा मिळाली. 

चाचणीसाठी पुण्याहून नमुने 
संसर्गजन्य "कोरोना'ची साथ पसरल्यानंतर तातडीची उपाययोजना म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कोरोना विषाणू तपासणीला सुरवात झाली. या प्रयोगशाळेचे COVID 19 चाचणी प्रयोगशाळा, असे नामकरण करण्यात आले. तपासणीसाठी "आयआरटीपीसीआर' अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. चाचणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (NIV) काही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, विभागप्रमुख प्रा. डॉ. मृदुला द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत संशोधक शास्त्रज्ञ डॉ. गायत्री पोतदार, डॉ. सुप्रिया माळवी, मनीषा तमायचेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पूजा ब्राह्मणे, स्मिता ठाकूर, अनिल यादव, योगेश सोनवणे, अर्जुन वाघ यांनी नमुन्यांची तपासणी करून अहवाल पाठविले. 

आठ ते दहा तासांत रिपोर्ट 
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने पाठविलेल्या अहवालांची तपासणी केल्यावर राष्ट्रीय विषाणू संस्थेने या प्रयोगशाळेस कोरोना विषाणूच्या नमुन्यांची चाचणी केली. त्यानंतर अहवाल देण्यास 31 मार्च 2020 पासून परवानगी दिली. पहिल्या दिवशी चार, तर आज दुसऱ्या दिवशी दहा नमुन्यांची तपासणी झाली. तेथे एका वेळेस 92 नमुन्यांची तपासणी करता येते. चाचणीसाठी सध्या आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असून सरावाने तो सहा तासांवर येईल. पूर्वी ही तपासणी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत सुरू होती. धुळ्यात ही सुविधा उपलब्ध झाल्याने वेळ व पैशांची बचत होईल. कोरोना विषाणू तपासणीचे वैद्यकीय महाविद्यालयात चारशे कीट उपलब्ध आहेत. आवश्‍यकतेनुसार त्यांची मागणी होईल. नमुन्यांची तपासणी करताना प्रयोगशाळेत पुरेपूर दक्षता आणि सुरक्षा बाळगली जाते. कोरोना विषाणू नमुने तपासणीमुळे रुग्णांना अहवाल लवकर मिळेल. त्यामुळे रुग्णांवर औषधोपचारही तातडीने होतील. प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन लाभले. 


 

loading image