
सवाई मुकटी गावात पाटील परिवार वास्तव्यास होता. दोन खोल्याचे मातीच्या घरात पती- पत्नी आणि मुले राहत होते. नेहमीप्रमाणे मुले पुढच्या खोली तर पती- पत्नी मागच्या खोलीत झोपले होते.
चिमठाणे : सवाई मुकटी (ता. शिंदखेडा) येथे रविवारी रात्री एकच्या सुमारास मातीच्या घराचे छत अचानक कोसळले. घरात झोपलेल्या अरोस्तोलबाई अमृत देसले- पाटील (वय ५५) यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती अमृत पाटील (वय ६०) जखमी झाले.
सवाई मुकटी गावात पाटील परिवार वास्तव्यास होता. दोन खोल्याचे मातीच्या घरात पती- पत्नी आणि मुले राहत होते. नेहमीप्रमाणे मुले पुढच्या खोली तर पती- पत्नी मागच्या खोलीत झोपले होते. मात्र रात्री एकच्या सुमारास अचानक घराचे छत कोसळल्याने यात अरोस्तोलबाई व त्यांचे पती अमृत पाटील गाढ झोपेत असताना त्यांच्या अंगावर पडले. मुले पुढील घरात झोपलेली होती. त्यामुळे खोलीचे कुठलेही नुकसान झाले नाही. घरातील संसारोपयोगी वस्तूंचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. यात भांडे, धान्य, कपडे, घराचे सरे यांचे नुकसान झाल्याचे तलाठी एन. एस. पाटील यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले असून, त्याचा अहवाल शिंदखेडा येथील तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना पाठविला आहे. नायब तहसीलदार नितेंद्रसिंह राजपूत व महसूल मंडळ अधिकारी परमेश्वर धनगर यांनी भेट दिली. अरोस्तोलबाई पाटील यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. काटे यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले. याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात मुलगा प्रवीण पाटील याने खबर दिल्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक मनोज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे हवालदार प्रभाकर सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे