esakal | सत्ताधारी भाजपचेच नेते डेंगी, चिकनगुनियाच्या विळख्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule Municipal Corporation

सत्ताधारी भाजपचेच नेते डेंगी, चिकनगुनियाच्या विळख्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ


धुळे: शहरासह जिल्ह्यातील भाजपचे दोन नेते डेंगीच्या (Dengue) विळख्यात सापडले आहेत. एक नेता बरा झाला असून, दुसऱ्या नेत्याला डेंगीपाठोपाठ चिकनगुनियाची लागण झाली आहे. हे दोन्ही आजार डासांमुळेच होतात. याप्रश्‍नी महापालिकेने (Dhule Municipal Corporation ) उपाययोजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून यामुळे अनेक दवाखाने, रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. महापालिकेने मे मध्ये डास, साथीचे आजार नियंत्रित राहण्यासाठी फवारणी, धुरळणीसाठी तब्बल १४ कोटींचा ठेका दिला आहे. या प्रकरणी शासनाने जनहित लक्षात घेत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या


देवपूरमधील व्यापारी संकुलात असलेल्या एका दवाखान्यात बालक रुग्णांवर अक्षरशः पोर्चमध्ये राहण्याची व्यवस्था करून उपचार केले जात आहेत. अनेक अधिकारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या आजारांची लागण झाली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असे असताना भाजपचेच नेते डेंगी, चिकनगुनियाच्या विळख्यात सापडल्याने महापालिकेच्या गैरकारभारासह निष्क्रियतेचे पितळ उघडे पडल्याची जनमानसात भावना आहे. नेत्यांचीच ही गत तर सर्वसामान्य धुळेकरांनी दाद मागावी कुठे, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. असे असताना प्रभावी उपाययोजना करण्याचे सोडून, फवारणीसाठी मंजूर ठेक्यातील १४ कोटी रुपये पाण्यात घालण्याचा कारनामा करत महापालिका प्रशासनाने डेंगी, चिकनगुनियाचे डास, अळी ज्या नागरिकांच्या घरात सापडतील, त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा फतवा काढला आहे. त्यामुळे धुळेकरांमध्ये संतापाची लाट पसरते आहे.


शिवसेनेची जनहितासाठी उडी
डेंगी, मलेरिया, टायफॉईड, चिकनगुनिया, फ्लू यासारख्या आजाराने शहरासह जिल्हा बेजार असताना महापालिका, पालिका, जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सुस्तावलेली असल्याचे गंभीर चित्र आहे. ते लक्षात घेत महापालिका क्षेत्रात शिवसेनेने जनहितासाठी या विषयात उडी घेतली असून शासनाने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. देवपूर भागात प्रभाग क्रमांक एकपासून डेंगीचा उद्रेक झाला. ते वेळोवेळी निदर्शनास आणल्यावरही महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली नाही.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌

प्रलंबित प्रश्‍नांमुळेच उद्रेक
ठेकेदार, आरोग्य कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराला संकटात लोटल्याची भावना आहे. आधीच मनपातर्फे आठ-आठ दिवस पिण्याचे पाणी येत नाही. त्यामुळे नागरिक पाणी साठविणारच. घंटागाड्यांच्या सेवेचा बोजवारा उडाल्याने मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचा प्रश्‍न आहे. त्यात भूमिगत गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. कॉलनी परिसरात झाडेझुडपे वाढली आहे. त्यात पावसाची भर पडते आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंगी, चिकनगुनियासह विविध आजारांनी धुळेकर बेजार झाले आहेत.


कोट्यवधींच्या ठेक्याचे गौडबंगाल
शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख ललित माळी यांनी पत्रकाद्वारे सांगितले, की शहरात महिन्याच्या कालावधीत एलायझा टेस्टमध्ये १९३ रक्त तपासणी नमुन्यांपैकी ५३ रूग्ण डेंगीने बाधित आढळले. हा शासकीय आकडा आहे. प्रत्यक्षात डेंगीची रुग्णसंख्या खूप मोठी आहे. महापालिकेने २८ मेस नाशिकच्या दिग्विजय कंपनीस १४ कोटी २५
लाख ७९ हजार ७०० रुपयांचा डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी रासायनिक फवारणी, धुरळणीचा ठेका दिला. त्यात कागदोपत्री नाशिकचे शेळके नामधारी आहेत. वास्तविक, मनपातील सत्ताधारी भाजपच्या येथील नगरसेवकांचे नातेवाईक ठेक्यात भागीदार आहेत. करारानुसार ठेकेदारास दरमहा सुमारे ४० लाख रुपयांचे बिल महापालिका देणार आहे. यात ठेकेदाराचे ७७ कर्मचारी सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत सलग कामकाज करतील, त्यांना मनपाचे २० कर्मचारी सहकार्य करतील, प्रत्येक खासगी कर्मचाऱ्यास दरमहा सरासरी २३ हजार रुपये सलग तीन वर्षांसाठी महापालिकेकडून दिले जातील, असा करारनामा आहे.

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता

निधी पाण्यातच जाणार..
काही दिवसांपूर्वी महापालिकेने ठेकेदारास एक कोटी रुपयांचे बिल दिल्याचे समोर येत आहे. मात्र, ठेकेदाराने मे- जूनपासून प्रामाणिकपणे काम केले असते तर शहरात डेंगी, चिकनगुनियाची रुग्णसंख्या नियंत्रित राहिली असती. तसे घडलेले नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत गेली आहे. परिणामी, १४ कोटीहून अधिक रकमेचा निधी पाण्यातच जाणार असल्याचे स्पष्ट आहे. महापालिकेने संगनमताने गैरव्यवहाराच्या नादात धुळेकरांचा जीव धोक्यात घातल्याचा गंभीर आरोप श्री. माळी यांनी केला आहे. महापालिकेने तत्काळ प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

loading image
go to top