esakal | धक्‍कादायक..विमा कंपनीला दीड कोटीला चुना 
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

२०११ ते मे २०१२ या कालावधीत १ कोटी २९ लाख ९१ हजार ३६२ रूपयांचा ग्रुप विमा काढला. मात्र, नूतनीकरणाअभावी जून २०१२ ला हा विमा बंद (लॅप्स) झाला. 

धक्‍कादायक..विमा कंपनीला दीड कोटीला चुना 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी विमा कंपनीला दीड कोटी रूपयांना चुना लावल्या प्रकरणी धुळे- नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक (ग. स.) लिमिटेडचे तत्कालीन अध्यक्ष, सीईओ आणि नाशिक येथील दोघा ठकसेनांवर येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
बजाज अलायन्ज लाईफ इन्शुरन्स कंपनीचे येथील गल्ली क्रमांक सहामधील मुख्य शाखाधिकारी प्रवीण बोरसे यांनी फिर्याद दिली. ती अशी ः ग. स. बँकेच्या माध्यमातून नाशिक येथील वसंत सिताराम निकम यांनी एजंट संदीप विजय हरवडे याच्या माध्यमातून २०११ ते मे २०१२ या कालावधीत १ कोटी २९ लाख ९१ हजार ३६२ रूपयांचा ग्रुप विमा काढला. मात्र, नूतनीकरणाअभावी जून २०१२ ला हा विमा बंद (लॅप्स) झाला. 

चौकशीत बिंग फुटले 
दरम्यान, ग. स. बँकेबाबत तक्रारींवर चौकशीसाठी साहाय्यक निबंधक मनोज चौधरी यांची नियुक्ती झाली. त्यांनी बजाज कंपनीला २०१३ ते २०१४ पर्यंत ग. स. बँकेमार्फत १ कोटी ७६ लाख २२ हजार ५००, तसेच १ कोटी ९९ लाख ५० हजार ३९६ रूपयांचा विमा काढल्याने त्याविषयी कागदपत्रांसह अधिक माहिती सादर करण्याची सूचना दिली. या पार्श्वभूमीवर चौकशी केली असता बजाज विमा कंपनीला या दोन विमा पॉलीसीबाबत कुठलिही माहिती (रेकॉर्ड) मिळाली नाही. या दोन पॉलीसी बनावट कागदपत्रांव्दारे तयार झाल्याचे निदर्शनास आले. यासंबंधी पावत्याही बनावट आणि जुन्या कागदपत्रांवरील स्वाक्षरी वापरून तयार करण्यात आल्या. 

वीस लाखांचे कमिशन 
एजंट संजय गणपत लेंडे यांच्यासह ग. स. बँकेत फेडरल फायनान्स कन्सल्टंट कंपनीचे संचालक वसंत निकम, कल्पेश भगवंत जोशी यांनी बँकेचे तत्कालिन सीईओ रमेश यशवंत पवार, तत्कालिन अध्यक्ष (नाव माहित नाही) आदींनी संगनमत, कटकारस्थानातून कंपनीला खोटी माहिती पुरवून बोगस कागदपत्रे सादर करून बनावट दोन विमा पॉलिसी तयार करण्यात आल्या. गंभीर बाब म्हणजे फेडरल कंपनीत १२ व्यक्ती काम करत असताना एकूण ३ हजार ६९४ कर्मचारी कार्यरत असल्याची खोटी माहिती सादर करण्यात आली. यात अधिकचे कर्मचारी हे ग. स. बँकेचे सभासद असून ते फेडरल कंपनीचे कर्मचारी दाखविण्यात आले. याआधारे १ कोटी १० लाख ८ हजार २३७ रूपयांचा विमा काढण्यात आला. ही फसवणूक करताना वसंत निकमने वीस लाख रूपयांचे कमिशन घेतले. 
 
चार जणांविरूध्द गुन्हा 
खोट्या कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलीसीच्या अनुषंगाने सभासदांचे सुमारे १ कोटी ४१ लाख रूपयांचे क्लेम दाखल करून अपहार केला, असे बोरसेंच्या फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार विविध कलमान्वये शेअर मार्केट व्यावसायिक वसंत सिताराम निकम (वय ४८, रा. १३११, गुजरवाडा, ता. येवला, जि. नाशिक, ह. मु. शिवशिल्प अपार्टमेंट, तिरूपती टाऊन, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड, नाशिक), कल्पेश भगवंत जोशी (वय ३९, रा. कृष्णकुंज, अशोका मार्ग, अशोका टॉवर मागे, नाशिक-११), ग. स. बँकेचे निवृत्त सीईओ रमेश यशवंत पवार (वय ६४, रा. २१ अनमोलनगर, देवपूर, धुळे), तत्कालिन अध्यक्षाविरूध्द गुन्हा दाखल झाला.