esakal | कोरोनाची महामारी तरीही आरोग्‍य उपकेंद्र उघडले नाही
sakal

बोलून बातमी शोधा

phc closed coronavirus

आरोग्य उपकेंद्राला लागूनच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, व्यायाम शाळा व लोकवस्ती आहे. आरोग्य उपकेंद्र परिसरात वाढलेल्या गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

कोरोनाची महामारी तरीही आरोग्‍य उपकेंद्र उघडले नाही

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील आरोग्य उपकेंद्र क्रमांक दोनमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्य केंद्राच्या अवतीभवती उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजरगवतासह उघड्यावर वाहणाऱ्या गटारीमुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सध्या जैताणे आरोग्य उपकेंद्र क्रमांक दोन पुरेशा सुविधांअभावी कोरोना काळातही बंद स्थितीत असून रुग्णालय प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे व आरोग्य उपकेंद्रही कार्यान्वित केले पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
आरोग्य उपकेंद्राला लागूनच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, व्यायाम शाळा व लोकवस्ती आहे. आरोग्य उपकेंद्र परिसरात वाढलेल्या गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तसेच उघड्यावरील गटारीमुळेही प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे. उपकेंद्र परिसरात ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी उघडयावर वाहते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून हे सांडपाणी भूमिगत गटारीत सोडले गेले पाहिजे. उपकेंद्राची इमारतीचीही दुरावस्था झाली आहे. आरोग्य कर्मचारीही येथे आढळून येत नाहीत. गावाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या आरोग्य उपकेंद्राची ही अवस्था आहे. गावाच्या आरोग्याचा सर्व्हे करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या आरोग्याचा सर्व्हे कुणी करावा? असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

रुग्णकल्याण समितीच्या चौकशीची गरज
प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समित्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या समित्यांच्या नियमित बैठका होतात का? रुग्णकल्याणासाठी येणारा लाखो रुपयांचा निधी नक्की जातो कुठे? यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानिक आर्थिक बजेटचे काय? या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या आरोग्याच्या प्रश्नावर गटातटाचे व जातीपातीचे संकुचित राजकारण करू नये अशीही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

संपादन ः राजेश सोनवणे