जिद्दीने पोहचला नवोदयला....आता मोबाईलमुळे शिक्षणाची रेंज तुटतेय

vishal pavra navoday exam clear
vishal pavra navoday exam clear

कापडणे : घर, आसरा मिळण्यासाठी ‘कुणी घर देता का घर?, एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्‍या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगला जंगलात हिंडतंय. जिथून कुणी उठवणार नाही, अशी एक जागा धुंडतंय. कुणी घर देता का घर?’ हे स्‍वगत आहे ‘नटसम्राट’ या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर या पात्राचे. असहाय्य स्‍थितीत त्‍यांच्यासमोर निर्माण झालेला प्रश्‍न आहे. हे सगळं नाटकात घडलं. परंतु असाच काहीसा प्रश्‍न एका आदिवासी समूहातील विद्यार्थ्यांसमोर ऑनलाइन शिक्षणप्रणालीमुळे आला आहे. हुशार आहे, शिकण्याची जिद्द आहे; परंतु गरिबीमुळे ‘कुणी मोबाईल देता का मोबाईल’, हे म्‍हणण्याची वेळ आली आहे.

कापडणे शेतशिवारातील झोपडीत राहणाऱ्या विशाल पावराने जवाहर नवोदय परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करून नवोदय विद्यालयात प्रवेश झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे शाळेचा ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. मात्र, महिन्याभरापासून विशालचा अभ्यास बुडत आहे. त्याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल नाही. त्याला हवाय मोबाईल. विविध संकटातून पुढे जाणाऱ्या छोट्या विशालची इतरांसाठी छोटी वाटणारी संकटे त्याच्यासाठी विशालमय झाली आहेत. विशाल पावरा आणि मुकेश पावरा या दोन्ही झोपडीतील मित्रांनी नवोदय परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. झोपडीत राहणाऱ्या ‍या मित्रांचे यश सर्वसुविधांमध्ये राहणाऱ्या ‍विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन भरणारेच आहे. 

विशाल पुढंची संकटेही ‘विशाल’ 
तिसरीत असताना विशालची झोपडी जळाली. त्यात दप्तर जळाले. चौथीत शेतातून शाळेत येण्यासाठी मुंबईतील लेखकाने भेट म्हणून दिलेली नवी सायकल चोरीस गेली. पुढे लहान भाऊ आजारी पडला. त्यास घेऊन मध्य प्रदेशातील गावी परतावे लागले. या सर्व संकटात त्याचे शिक्षक आणि ‘सकाळ’ त्याच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. 

विशालचे मदतीसाठी आवाहन 
नवोदय विद्यालयाचा अभ्यास सुरू झाला आहे. त्याला ऑनलाइन अभ्यासासाठी अँड्रॉइड मोबाईल हवाय. मोबाईलअभावी त्याचा अभ्यास बुडत असल्याने त्याला नैराश्य आले आहे. त्याला हवाय मोबाईल; पण आई, वडिलांकडे पैसे नाहीत. दात्यांनी मदती करावी. भविष्यात सर्व मदतीचे परतफेड करेल, असे कृतज्ञ सूचक आवाहनही विशालने केले आहे. दरम्यान ९४०३४३५२१३ या मोबाईल क्रमांकावर मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. 

विशालची झोपडी ‘सकाळ’ने उभारली 
विशाल पावरा तिसरीत असताना त्याची झोपडी जळाली. त्याने मनस्ताप करीत शाळा बंद केले. याबाबतीत ‘सकाळ’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. त्याच्या वर्गशिक्षिका हर्षदा बोरसे व लेखिका स्मिता सराफ  यांनी प्रथम मदतीस सुरवात केली. राज्यभरातून मदत झाली अन्‌ एक सुंदर झोपडी उभी राहिली. विशाल पुन्हा नियमित शाळेत दाखल झाला. त्यानंतर आईने तंबाखू खाणे सोडावे म्हणूनही शाळा बंद केली होती. आईने तंबाखूचा त्याग केला अन्‌ त्याची शाळा नियमित सुरू झाली. सायकल चोरीस गेली. तिही परत मिळाली होती. 


संपादन : राजेश सोनवणे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com