धुळ्यात पावसाचा कहर; देवपूरला झोडपले; अनेक घरे- वसाहतींमध्ये पाणी 

निखील सुर्यवंशी
Friday, 24 July 2020

पावसाने मध्यरात्री कहर करत शहराला झोडपून काढले. पावसाचा तीन ते चार तास वेग कायम होता. सकाळी जागे झालेल्या देवपूर, नकाणे भागातील नागरिकांना ठिकठिकाणी नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. 

धुळे : शहरासह परिसरात गुरूवारी मध्यरात्री एकनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे देवपूर व नकाणे रोड परिसरातील अनेक रस्त्यांची वाताहत झाली, अनेक घरांमध्ये पाणी शिरले, खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहने फसली, काही कॉलन्यांमध्ये तळी साचून अर्ध्यापर्यंत वाहने बुडाली. त्यामुळे त्या- त्या भागातील रहिवाशांचे अतोनात हाल झाले. गोताणेसह धुळे तालुक्यात ठिकठिकाणी कांदाचाळी, पिके पाण्याखाली बुडाली. नुकसानग्रस्त नागरिकांसह शेतकऱ्यांनी पंचनाम्याची मागणी केली. 

 

चिखल, तळ्यांचे स्वरूप 
देवपूरमधील क्षस्तीग्रस्त व विविध भागात भूमिगत गटार, रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाले आहे. माती पसरल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याची सोय नाही. गटारी चोकअप, रस्त्यांना उंची आणि त्यापेक्षा घरे काहीशी खोलगट भागात, ड्रेनेजची पुरेशी सुविधा नाही आदी विविध कारणांमुळे योगेश्‍वर कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, अनमोलनगर, भरतनगर, केशरनगर, जितेंद्रनगर, सुयोगनगर आदी विविध भागातील वसाहतींना पाण्याचा वेढा पडला. अनेक घरांमुळे पाणी शिरले. बांधकामात काही नाले अतिक्रमणांमुळे बुजले गेल्याने, ते चोकअप झाल्याने काही घरांबाहेरील वाहने पाण्याखाली गेली. भरतनगरच्या फरशी पुलावरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणचे रस्ते चिखलमय, तसेच काही ठिकाणी तळे साचले. घरात शिरलेले पाणी उपसण्यासाठी संबंधित रहिवाशांना विजेच्या मोटरी लावाव्या लागल्या. नकाणे रोड परिसरातून वाहणारा गोंदूर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बुजला गेल्याने वसाहतींमध्ये पाणी शिरल्याची तक्रार काही रहिवाशांनी केली. 

आर्थिक नुकसानीचे प्रकार 
आरटीओ कार्यालयात दालनांबाहेर जाळ्या लावल्या आहेत. वेगवान वादळी वाऱ्यासह पावसाचे पाणी दालनांमध्ये जात असल्याने कामकाज विस्कळीत झाले. गळकी शासकीय कार्यालये अडचणीत सापडली. शहरातील मध्यवर्ती प्रबोधनकार ठाकरे संकुलातील तळ भागातील गाळ्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे काहींचे आर्थिक नुकसान झाले. बाफना हायस्कूलसह काही शासकीय कार्यालये, अपार्टमेंटच्या तळघरात पाणी साचले. साक्री रोड परिसरातील अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव, चितोड रोड भागातील वसाहती जलमय झाल्याचे चित्र होते. मध्यरात्रीसह शुक्रवारी दिवसभर पावसाळी वातावरण, अधूनमधून दमदार किंवा रिमझिम पावसामुळे, साक्री तालुक्याकडे पाऊस असल्याने शहरातील पांझरा नदी दुथडी भरून वाहू लागली. शिवाजी रोडवरील श्री कालीकामाता मंदिरालगत झालेल्या फरशी पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. तेथे पोलीस बंदोबस्त होता. पूर पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी करत सेल्फीचा आनंद घेतला. शहरासह परिसरातील नाले तुडुंब होऊन प्रवाहित झाले. रोगराई पसरू नये म्हणून महापालिका पूरक उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. 


 
पिकांसह लाखोंचा कांदा पाण्यात 
मध्यरात्रीनंतरच्या पावसामुळे गोताणे (ता. धुळे) परिसरासह ठिकठिकाणी पिके, कांदाचाळी पाण्याखाली गेल्या. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांची पडझड झाल्याने संबंधितांचा संसार उघड्यावर आला. साठवलेल्या धान्याचे नुकसान झाले. आमदार कुणाल पाटील यांच्या सूचनेनुसार तहसीलदार पाहणीसाठी गेले. तलाठी, मंडलाधिकारी, कृषी साहाय्यकांच्या पथकाने पंचनामे सुरू केले. नुकसानीच्या भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. पावसात शेवगा, कापसासह बाजरी, ज्वारीचे पिके वाहून गेली. शेतांमध्ये पाणी साचले. कांदाचाळीत पाणी शिरल्याने शेकडो क्विंटल माल भिजला, वाहून गेला. कांदाचाळी मोडकळीस आल्या. या स्थितीत भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. 

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule late night heavy rain all aria and house water