ऊसतोड कामगार परिवाराला मध्यरात्री सुखद धक्‍का

एल. बी. चौधरी
Sunday, 27 September 2020

ग्रामीण रुग्णालयात अतिशय गंभीर व गुंतागुंतीची डिलिव्हरी नॉर्मल करून एक महिला व तिच्या जुळ्या मुलांना जीवदान देण्याचे काम डॉ. प्रफुल्ल फुलपगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून महिलेची काळजी घेतली. 
 

सोनगीर (धुळे) : आजकाल कोणत्याही शासकीय रुग्णालयाबाबत चांगले बोलले जात नाही. मात्र, येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व सहकाऱ्यांनी समयसूचकता व तत्परता दाखवत एका आदिवासी गर्भवतीचे वेळेवर उपचार करून डॉक्टरमधील देवदूताची ओळख करून दिली. 
ग्रामीण रुग्णालयात अतिशय गंभीर व गुंतागुंतीची डिलिव्हरी नॉर्मल करून एक महिला व तिच्या जुळ्या मुलांना जीवदान देण्याचे काम डॉ. प्रफुल्ल फुलपगारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून महिलेची काळजी घेतली. 
सारंगखेडा (ता. नंदुरबार) परिसरातील काही आदिवासी मजूर कुटुंबे बारामतीला ऊसतोडणीसाठी ट्रकने जात होते. त्यातील बानुबाई रवींद्र काकडे या गर्भवतीची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिला भयंकर वेदना होत होत्या. सोनगीरला पोहोचताच ट्रकचालकाने सरळ ग्रामीण रुग्णालय गाठले. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रात्री एकच्या सुमारास तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. प्रफुल्ल फुलपगारे, परिचारिका शीतल मालवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरू केले. 

जुडवा तेही पायाळू
महिलेची अवस्था काहीशी चिंताजनक असताना डॉ. देवरे व परिचारिकांनी प्रयत्न सुरूच ठेवले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पाटील यांचे मोबाईलवर मार्गदर्शन सुरूच होते. महिलेने एका मुलाला व दहा मिनिटांनी दुसऱ्याला अशा जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष म्हणजे दोन्ही मुलांच्या पायाकडील भागाने व तोही नॉर्मल जन्म झाल्याने उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विशेष पीपीई किट नसताना केवळ महिला व तिच्या पोटच्या गोळ्यांना वाचवायचे, या उद्देशाने व निरपेक्ष भावनेने केलेल्या कार्याबद्दल प्रसूत महिलेच्या नातेवाइकांनी आभार मानले. रात्रभर डॉक्टर व कर्मचारी जागे राहून तिची देखभाल करीत होते. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी जगन्नाथ कर्वे, सिद्धार्थ शिंदे, कैलास ठाकूर, नाना खैरनार यावेळी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule late night sugarcane workers family birth double child