Loksabha 2019 : पाडापाडीची संस्कृती  थोपविण्याचे आव्हान 

निखिल सूर्यवंशी
रविवार, 17 मार्च 2019

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या राजकारणाची संस्कृती थोपविण्याचे, तसेच दोन्ही जिल्ह्यांतल्या नेत्यांसह इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलन घडवून आणण्याचे आव्हान कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपुढे असेल. 

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या राजकारणाची संस्कृती थोपविण्याचे, तसेच दोन्ही जिल्ह्यांतल्या नेत्यांसह इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये मनोमीलन घडवून आणण्याचे आव्हान कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपुढे असेल. 

कुठल्याही निवडणुकीवेळी खरे तर गटबाजी, रुसवे- फुगवे, मतभेद, पाडापाडीच्या राजकारणामुळे कॉंग्रेस पक्ष गाजत असतो. मात्र, यंदा धुळे जिल्ह्यात हे चित्र काहीसे पालटले असून "एकी'चे दर्शन घडत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो आहे. लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना तुल्यबळ लढत केवळ कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील हेच देऊ शकतील आणि त्यांच्या रूपाने कॉंग्रेसला विजय मिळेल, असे वातावरण निर्माण करण्यात समर्थकांसह कार्यकर्त्यांना यश आले. अशात वयाच्या मुद्यावरून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव उमेदवारीत आघाडीवर आल्याने रंगत निर्माण झाली आहे. 

आमदार पटेलांचे पाठबळ 
मतदारसंघात दोन वेळा पराभवाची चव चाखावी लागल्याने कॉंग्रेसचे नेते आमदार अमरिशभाई पटेल यांनी लोकसभा निवडणुकीचा नाद सोडला. त्यांनी पूर्वीच्या काळातील मतभेद, कटुता विसरून शक्तिनिशी माजी मंत्री पाटील यांना पाठबळ देण्यास सुरवात केली. त्यांनाच उमेदवारी मिळावी, यात कुठलाही वयाचा अडसर येत नाही, अशा मुद्यावर आमदार पटेल हे कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत भांडलेही. माजी मंत्री पाटील हेच भाजपच्या उमेदवाराला शह देऊ शकतात, किंबहुना ते पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात, असेही आमदार पटेल यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. 

उमेदवार निवडीत कसरत 
जिल्ह्यात पक्षीय स्तरावर सकारात्मक वातावरण असताना आणि पक्षश्रेष्ठींपासून अनेकांना या मतदारसंघातून एकाच उमेदवाराचे नाव निश्‍चित व्हावे, अशी अपेक्षा होती. मात्र, नाशिक जिल्ह्याने मालेगावस्थित पक्षाचे नेते डॉ. तुषार शेवाळे यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले. दरवेळी धुळे जिल्ह्याकडे उमेदवारी जाते. यंदा ती नाशिक जिल्ह्याला मिळावी म्हणून कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले. पक्षाला विजय हवा असेल तर माजी मंत्री पाटील हे योग्य उमेदवार, तर ज्येष्ठांना नव्हे तर तरुणांना संधी दिली जावी, दहा वर्षांपासून मतदारसंघात कार्य करणारे डॉ. शेवाळे हे सक्षम उमेदवार ठरतील, असे दावे- प्रतिदावे समर्थकांकडून सुरू आहेत. उमेदवार निवड ही तशी कॉंग्रेसला या मतदारसंघात बऱ्याचदा डोकेदुखी ठरली आहे. यंदाही या प्रक्रियेत तारेवरची कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागत असल्याचे चित्र आहे. धुळे जिल्ह्याला उमेदवारी मिळाली तर नाशिक जिल्ह्याकडील अर्ध्या मतदारसंघातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची नाराजी पक्षश्रेष्ठींना दूर करावी लागेल. तसेच त्यांना गटबाजी, मतभेद, रुसवे- फुगवे थोपविण्याचे आव्हानही पेलावे लागेल. अन्यथा, पाडापाडीच्या राजकारणात कॉंग्रेसची शकले होतील, याची जाणीव कॉंग्रेसचे ज्येष्ठ, निष्ठावंत पदाधिकारी करून देत आहेत. 
 
...तर विधानसभेचा हक्क कायम राहावा 
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात उमेदवारी करण्याबाबत पक्षादेश झाला तर तो टाळता येणार नाही. मात्र, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीतला हक्क कायम ठेवून लोकसभेसाठी उमेदवारी करू, अशी भूमिका आमदार कुणाल पाटील घेत असल्याचे समर्थक सांगतात. तसेच ते वडील माजी मंत्री रोहिदास पाटील यांनाच उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी शक्ती पणाला लावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule loksabha election