esakal | प्रमुख पक्षांचे तुम लढो, हम देखते है! 
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

तुम्ही निवडून आमच्याकडे या, असे तथाकथित पक्षश्रेष्ठी बजावत आहेत. म्हणजे खर्च करायला तयार नाहीत. पक्षपुरस्कृत पॅनल पुरवून नाराजी ओढून घ्यायला तयार नाहीत.

प्रमुख पक्षांचे तुम लढो, हम देखते है! 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका असल्या म्हणजे गल्लीबोळांतील पक्ष कार्यकर्ते पक्षाचा झेंडा धरून ‘...की जय’ करतात. बऱ्याचशा भानगडी अंगावरही घेतात; पण हेच कार्यकर्ते ग्रामपंचायतीसाठी इच्छुक आहेत. त्यांना कुणी थारा द्यायला तयार नाही. तुम्ही निवडून आमच्याकडे या, असे तथाकथित पक्षश्रेष्ठी बजावत आहेत. म्हणजे खर्च करायला तयार नाहीत. पक्षपुरस्कृत पॅनल पुरवून नाराजी ओढून घ्यायला तयार नाहीत. त्या इच्छुकांना आतापासूनच वाऱ्या‍वर सोडले आहे. म्हणजे ‘तुम लढो हम देखते है’, ची भूमिका त्यांनी घेतली आहे. 

जमवाजमवीचा जांगडगुत्ता 
धुळे जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. गल्लीबोळांतील बाहेरगावी स्थायिक झालेली भाऊबंदकी, विखुरलेले मतदार आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू आहे. एका गोटात असलेले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गोटात दिसत आहेत. त्यामुळे आतापासून पळवापळवी सुरू झाली आहे. जमवाजमवीचा जांगडगुत्ता जटिल होत चालला आहे. 

पक्षपुरस्कृत पॅनल नाहीच? 
गाव गल्लीबोळांतील कार्यकर्ते ग्रामपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी इच्छुक असतात. त्यासाठी ते पक्षाच्या मोठ्या पुढाऱ्यांमागे अथवा लोकप्रतिनिधींच्या मागे धावपळ करतात. तेच आता पंचायतीसाठी इच्छुकांकडे दुर्लक्ष करीत आहेत. पक्षपुरस्कृत पॅनल द्यायला नाकारत आहेत. पॅनल दिल्यास खर्च करावा लागेल म्हणूनच त्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तुम्ही निवडून या, मग सरपंच बसविण्यासाठी खर्च करण्याची तयारी ते दर्शवित आहेत. आता ते जर ग्रामपंचायत निवडणुकीचा भार अंगावर घेत नसतील, तर पुढे अडचण निर्माण करू, असेही ते इच्छुक आपापसात चर्चा करीत आहेत. 

कापडणेत मोठाभाऊ अन्‌ बापूंच्या भूमिकेकडे लक्ष 
कापडणे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून असते. येथे राज्यातील सर्वच राष्ट्रीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. सध्या तर भाजप कृषी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कृषी सभापती बापू खलाणे आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व गटनेते भगवान पाटील ऊर्फ मोठाभाऊ जिल्हास्तरीय नेते येथील रहिवासी आहेत. त्यांच्या भूमिकेकडे ग्रामस्थांसह त्यांच्या इच्छुक समर्थकांचे लक्ष लागले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image