हुश्‍श...अखेर मिळाली परवानगी : धुळे शहरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने उघडणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

कोरोनामुळे बंद असलेली महापालिका हद्‌दीतील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने शासन आदेशानुसार उद्या (ता.5) पासून सुरू करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले. तत्पूर्वी व्यापारी असोसिएशननेही केलेल्या मागणीनुसार दुकाने सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन होता.

धुळे : कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्याने गेली 71 दिवस बंद असलेली शहरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठानांचे "टाळे' अखेर उद्या (ता.5) पासून उघडण्यास सुरवात होईल. प्रशासनाने अटी-शर्तींवर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांचाही जीव भांड्यात पडला आहे. या निर्णयामुळे अत्यावश्‍यक वस्तू वगळता इतर वस्तूंच्या खरेदीसाठी दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

हेपण वाचा - अखेर निर्णय झाला : जळगावातील दुकाने या वेळेत राहणार खुले   

कोरोनामुळे बंद असलेली महापालिका हद्‌दीतील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने शासन आदेशानुसार उद्या (ता.5) पासून सुरू करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले. तत्पूर्वी व्यापारी असोसिएशननेही केलेल्या मागणीनुसार दुकाने सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन होता. या पार्श्‍वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने आवश्‍यक उपाययोजना व खबरदारी घेऊन शासनाच्या धोरणानुसार अटी-शर्तींवर दुकाने सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. व्यापारी, प्रतिष्ठाने व दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाचदरम्यान निश्‍चित करण्यात आली आहे. यात दूध व विक्रेत्यांना व मेडिकल दुकानांना वगळण्यात आले आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये बंदीच
दरम्यान, मनपामार्फत घोषित कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) मध्ये दुकाने, प्रतिष्ठाने सुरू करण्याची परवानगी लागू राहणार नाही. असेही महापालिकेच्या आदेशात म्हटले आहे.

हे बंधनकारक
व्यापारी बांधवांनी गर्दी नियंत्रण व सोशल डिस्टन्सींगचा निकष पाळणे गरजेचे आहे. दुकानातील ग्राहक व कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. अटी-शर्तींचे पालन न झाल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. दुकाने अटी-शर्तीनुसार सुरू असल्याबाबतच्या कार्यवाहीवर नजर ठेवण्यासाठी मनपा व पोलिसांचे पथक कार्यरत असेल.

अशी आहे परवानगी
उद्या (ता.5) पासून विषम तारखेस (उदा.1, 3, 5, 7, 9) ज्या दुकाने, व्यापारी प्रतिष्ठानांचे मुख्य प्रवेशद्वार रस्त्याच्या पूर्व व दक्षिणेला आहे ते तर सम तारखेस (उदा. 2, 4, 6, 8) ज्या दुकाने, व्यापारी प्रतिष्ठानांचे मुख्य प्रवेशद्वार पश्‍चिम व उत्तरेला आहे ते घालून दिलेल्या अटी-शर्तीवर सुरू ठेवता येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule market and shop open tomarrow