गोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी! 

गोटेंच्या आव्हानापुढे महाजनांची कसोटी! 

ळे ः आमदार आणि स्थानिक दोन मंत्र्यांमधील वादाचा परिणाम येथील महापालिका निवडणुकीवर होऊ नये, परिवर्तनातून सत्ता पक्षाच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने "संकटमोचक', प्रतिमुख्यमंत्री समजले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. 10) येथे पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले. हा निर्णय आमदार गोटे यांच्या पचनी पडला नाही आणि त्यांच्या विरोधकांच्या माळेत आता मंत्री महाजनांचा समावेश झाला. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यापुढे आपल्याच पक्षाच्या आमदारांनी दिलेले आव्हान कसोटीचे ठरणार आहे. 
महापालिका निवडणुकीचे नेतृत्व आपल्याला वगळून जलसंपदामंत्री महाजन, संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना दिल्याने आमदार गोटे संतप्त झाले आहेत. तसेच इतर पक्षांतील विरोधकांसह काही नामचीन गुंड, गुन्हेगारांना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्याचा धडाका मंत्री महाजन, भामरे, रावल आणि शहराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी लावल्याचा आरोप करणारे आमदार गोटे या मुद्यावरून कमालीचे भडकले आहेत. त्यातून त्यांनी निमंत्रण नसताना पक्षाच्या महापालिका विजय संकल्प मेळाव्यात गोंधळ घातल्याने, पक्ष प्रवेशाचा वाद मुद्यावरून गुद्यावर गेल्याने भाजपची हवा खराब होऊ लागल्याचे मानले जाते. 

भाजपच्या प्रतिमेला तडा 
शहरात जे. बी. रोडवर शनिवारी रात्री साडेआठनंतर झालेल्या धुळे महापालिका विजय संकल्प मेळाव्यात आमदार गोटे आणि प्रदेशाध्यक्ष दानवे, मंत्री भामरे, मंत्री महाजन, पर्यटनमंत्री रावल यांच्यात उघडपणे झालेल्या वादासह वर्तणुकीचे परिणाम पक्ष प्रतिमेला तडा देणारे, पक्षाची ऐन निवडणुकीत हवा खराब करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे राजकीय पटलावर मानले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बॅनर, मेळाव्यास्थळी व्यासपीठावर असलेल्या बॅनरवर आपले छायाचित्र नसणे, निमंत्रण नसणे या कारणांवरून आमदार गोटे यांनी व्यासपीठाचा ताबा घेत प्रदेशाध्यक्षांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यात गोटे यांना बोलू दिले पाहिजे होते किंवा नाही हा शहरात आता खमंग चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. 

भाजपकडून आमदार गोटेंना अंतर 
आपला भाजप पक्ष या महापालिका निवडणुकीसह नेतृत्वापासून आपल्याला दूर ठेवत असल्याचे लक्षात आल्यावर आमदार गोटे यांनी शहर विकासाचा मुद्दा पुढे करत 25 वर्षांपासून असलेले क्रमांक एकचे राजकीय शत्रू राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी प्रसंगी युती करण्यास तयार असल्याची भूमिका जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री राजी असले तर ही युती करीन, असे सांगत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना काय संकेत द्यायचे ते दिले. 

गुंडांच्या प्रवेशावर तीव्र आक्षेप 
इतर पक्षांतील काही नगरसेवक आणि शहरातील काही नामचीन गुंड, गुन्हेगारांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याने भाजपला विजय कसा मिळेल, महापालिकेत सत्ता कशी मिळेल, असा प्रश्‍न आमदार गोटे उपस्थित करीत आहेत. भाजपमधील आपल्याच विरोधकांनी इतर पक्षांतील विरोधक, काही नामचीन गुंड, गुन्हेगारांना पक्ष प्रवेश देऊन आपली या मुद्यावरील विरोधाची धार कमी केल्याचे आमदार गोटे यांना वाटते. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. परिणामांची कुठलीही चिंता न करता महापालिका निवडणुकीत भाजपच्याच कमळ चिन्हावर राजकीयदृष्ट्या कोऱ्या पाट्या असलेल्यांनाच उमेदवारी देऊ, असे सांगत आमदार गोटे स्वकीयांची कोंडी करीत असल्याचे चित्र आहे. या सर्व मुद्यांआधारे निवडणुकीचे नेतृत्व करणारे मंत्री महाजन यांच्यापुढे गोटेंनी निर्माण केलेले आव्हान कसोटीचे ठरणारे आहे. 

"मिशन फिफ्टी प्लस'चे काय? 
आमदार गोटे यांनी स्वकीयांपुढे निर्माण केलेल्या आव्हानातून भाजप, मंत्री महाजन, भामरे हे "मिशन फिफ्टी प्लस' कसे साध्य करणार, शहराला छळणाऱ्या वादग्रस्त गुंडगिरीच्या मुद्यावर नेमके कोण "संकटमोचक' ठरणार, हे पाहणे आवश्‍यक ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com