कार्यक्रम पवारांचा चर्चा अमरीशभाईंची 

कार्यक्रम पवारांचा चर्चा अमरीशभाईंची 

धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार दौऱ्यावर येऊन गेले आणि एका दगडात अनेक पक्षी टिपून गेले. त्यांनी भाषणात मांडलेल्या भूमिकेचा अन्वयार्थ काढण्यात अनेक राजकीय मंडळी अद्याप गुंतलेलीच आहे. यातील चर्चा शिरपूरचे भाग्यविधाते, माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांच्याभोवती घुटमळत आहे... 


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्याने एखाद्या कार्यक्रमात कॉंग्रेस नेत्याच्या कार्यकर्तृत्वाचा पोवाडा गायचा, हे काहीसे अचंबित करणारे ठरेल. त्यात शरद पवार यांनी आमदार अमरिशभाई पटेल यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, श्री. पवार यांचे अभ्यासपूर्ण भाषण जाणून घेतले, तर त्याचा केवळ विकासासंबंधी अन्वयार्थ असल्याचेच स्पष्ट होऊ शकेल. 

मतभेदांमुळे जिल्ह्याचे नुकसान 
पवार यांचा भाषणातील रोख शहरासह जिल्हा विकास आणि नेतृत्वाकडे होता. जळगाव, नाशिक, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्र आणि धुळे शहर, अशी विकासाबाबत तुलना करताना पवार यांनी शिरपूर शहरासह तालुक्‍याच्या विकासाला नजरेआड केले नाही. ते म्हणाले, की धुळ्यात खूप वर्षांनी आल्यानंतर रस्ते सुधारलेले दिसतात, पाणीपुरवठा योजना मंजूर झाली; पण पूर्णत्वास गेलेली नाही, "एमआयडीसी'ची स्थापना झाली आणि तेथे लघु, मध्यम उद्योग आले; परंतु मोठे कारखानदार अद्याप पोहोचलेले नाहीत, असे अनेक प्रश्‍न आजही धुळ्याला सतावत असल्याचे समोर आले. धुळ्याच्या विकासासंदर्भात अनेक कार्यक्रम हातात घेतले गेले. मात्र, अंतर्गत मतभेदामुळे या कार्यक्रमांची अंमलबजावणी पूर्णपणे होऊ शकली नसल्याने त्याची किंमत धुळेकरांना द्यावी लागते आहे, अशा जाणिवेचे अंजन पवार यांनी धुळेकरांसह नेतृत्वाच्या डोळ्यात भरले. त्यावरून कुणी काय बोध घ्यावा हे महत्त्वाचे ठरू शकेल. 
 
दृष्टिकोन बदलल्यास भाग्योदय 
जळगाव, नाशिक बदलतेय मग धुळे का नाही, असा पवार यांचा साधा-सरळ प्रश्‍न आहे. पिंपरी- चिंचवड शहराचा अचंबित करणारा विकास पाहता त्यांचा आदर्श पुणेकरांनी घ्यावा, असे आता म्हटले जाते. विकासप्रश्‍नी एकत्र बसून निर्णय घेण्याची पद्धत आणि त्यास सर्व सहकार्याची भूमिका हे पिंपरी- चिंचवडच्या यशाचे गमक पिंपरी शहराला वेगळ्या दिशेला नेत आहे, असे सांगत हाच दृष्टिकोन धुळ्याबाबत स्वीकारण्याचा मौलिक उपदेश पवार यांनी स्थानिक नेत्यांना केला. एवढेच नव्हे तर धुळे जिल्ह्यातील राजकीय पक्षांना विनंती करत निवडणुकीत परस्परांत संघर्ष करा, कुणाला निवडायचे किंवा काय करायचे तो निकाल ठरवा, मात्र, नागरिकांच्या न्यायासंबंधी कार्यक्रमात राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची भूमिका स्वीकारली तर पाच वर्षांत धुळे बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. पवारांना ते कळू शकते, तर स्थानिक नेत्यांना का नाही हा कळीचा प्रश्‍न ते चर्चेसाठी सोडून गेले. 
 
अमरिशभाईंची राज्याला उपयुक्तता 
विकासाविषयी ऊहापोह करताना पवार यांनी थेट नेतृत्वाचा "ट्रेंड' बदलावा लागेल, असा सूचक संदेशही दिला. त्याला अमरिशभाईंच्या कार्यकर्तृत्वाची जोड देण्यास ते विसरले नाहीत. जिल्ह्याला विधायक कामाची आणि कर्तृत्वाची दिशा दाखविणारे शिरपूरचे आमदार, ज्येष्ठ नेते अमरिशभाई, असा उल्लेख करण्याचा मोह पवार यांना टाळता आला नाही. अमरिशभाईंचा आदर्श आपल्यापुढे आहे. शिरपूर शहर व तालुक्‍यात कशा पद्धतीने सुधारणा होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. मात्र, कार्यकर्तृत्वाचा केंद्रबिंदू शिरपूरपर्यंत मर्यादित न ठेवता अमरिशभाईंनी बाहेर पडले पाहिजे, जिल्हा आणि राज्याचे नेतृत्व केले पाहिजे. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला उपयुक्तता आहे. ज्याला व्यवहार, विकास नीट कळतो, उद्याचे चित्र समजते, अशांच्या हातात सूत्रे असली की ते राज्य व समाजहिताचे ठरते. त्याचे उत्तम दर्शन अमरिशभाईंनी दाखविले आहे, अशा शब्दांत पवार यांनी केलेला गौरव इतर नेते मंडळींना बरेच काही सांगून गेला आहे. 

मार्मिक उपदेश अन्‌ धुळ्याचे भवितव्य... 
अमरिशभाईंसारखा पुढाकार इतर नेत्यांनी घ्यावा. राजकारणासाठी राजकारण करू नये. ते विकासासाठी असावे. निवडणुकीपुरता मतभेद, संघर्ष असावा. ते लक्षात घेतले तर नाशिक, जळगाव का बदलले, आपण का नाही याचे उत्तर गवसेल, असा पवार यांनी केलेला मार्मिक उपदेश स्थानिक किती नेत्यांना पचनी पडतो त्यावर धुळ्याचे भवितव्य अवलंबून असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com