कोण "पॉवरफुल'? सोमवारीच फैसला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

धुळे ः "आमचा नेता लय पॉवरफुल' या गीताने महिनाभर प्रचारात रंगत भरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना की लोकसंग्राम पक्षाचे नेते "पॉवरफुल' हे सोमवारी (ता. 10) निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या आघाडीसह चार पक्षांमधील काटा, अटीतटीच्या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 

धुळे ः "आमचा नेता लय पॉवरफुल' या गीताने महिनाभर प्रचारात रंगत भरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना की लोकसंग्राम पक्षाचे नेते "पॉवरफुल' हे सोमवारी (ता. 10) निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या आघाडीसह चार पक्षांमधील काटा, अटीतटीच्या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. 
महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणीत सरकार असल्याने या पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपमधील पक्षीय नेतृत्वाच्या वादामुळे या निवडणुकीचे रंग बदलत गेले. महिन्यात राजकारण किती आणि कसे बदलून जाऊ शकते याचा एक नमुना म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. 
 
मंत्री विरुद्ध आमदार 
निवडणुकीच्या नेतृत्वातून भाजपचे नेते व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि आमदार अनिल गोटे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. परिणामी, आमदार गोटे यांनी भाजपविरुद्ध बंड पुकारत स्व-संस्थापक असलेल्या लोकसंग्राम पक्षाकडून स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरविले. 
 
मंत्र्यांविरुद्ध विरोधक एकवटले 
या पार्श्‍वभूमीवर आमदार गोटे यांच्या पाठोपाठ कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी शिक्षणमंत्री व आमदार अमरिशभाई पटेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजवर्धन कदमबांडे, आमदार कुणाल पाटील यांनी भाजपला रोखण्यासाठी, विशेषतः जिल्ह्यातील मंत्री भामरे, रावल यांचे वाढते वलय धूसर करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. शिवसेनेचा भाजपविरोधातच पवित्रा आहे. निवडणुकीत यंदा प्रथमच कॉंग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी झाली आहे. यातून भाजप विरुद्ध इतर सर्व, असे चित्र महापालिकेच्या रणसंग्रामातून पुढे आले आहे. 

प्रचारात कमालीची रंगत 
शहराचा विकास आणि गुंडगिरीच्या मुद्यावरून राजकारण तापविण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांकडून माजी मंत्र्यांना प्रचाराच्या रिंगणात उतरविण्यात आले. त्यामुळे रंगत आणखीनच वाढली. यंदा प्रथमच चार उमेदवारांचा एक प्रभाग झाला. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने उमेदवारांची प्रचार करताना दमछाक झाली. प्रचार आणि सत्ताधारी- विरोधकांनी एकमेकांवरील डाव- प्रतिडावांवर "वॉच' ठेवत लढतीचे नियोजन केले. महापालिकेच्या सत्तासंघर्षात महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडी, भाजप, शिवसेना, लोकसंग्रामच्या नेत्यांची कसोटी, प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदार कुणाच्या हाती सत्तेची दोरी सोपवितात याची उत्कंठा सोमवारी निकाल जाहीर होईपर्यंत कायम असेल. 
 

Web Title: marathi news dhule muncipal corporation election