गोटेंशी "फायटिंग'ची "टेस्ट' भाजपसाठी ठरणार "बूस्टर'? 

गोटेंशी "फायटिंग'ची "टेस्ट' भाजपसाठी ठरणार "बूस्टर'? 

धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पक्षानेही आता हे आव्हान स्वीकारले आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अशीच आव्हाने पक्षासमोर उभी राहणार आहेत. त्यामुळे धुळ्यातील हे आव्हान मोडून यश मिळाल्यास हा विजय पक्षासाठी राज्यभरात "बूस्टर डोस' ठरेल.. आणि अयशस्वी ठरला तर मात्र भाजपला रणनीतीही बदलावी लागेल.. त्यामुळे येथील महापालिका निवडणुकीत गोटेंचे आव्हान हेच भाजपसाठी खरी परीक्षा ठरणार आहे. 

राजकीय धुरिणांचे लक्ष 
भाजपची देशात अन्‌ राज्यातही सत्ता आहे. त्यामुळे पक्षाला थेट आव्हान देण्याचे धाडस कोणीही केलेले नाही. भाजपचे भंडारा-गोंदियाचे तत्कालीन खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांनी पक्षाला थेट आव्हान दिले नव्हते. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे पक्षावर नाराज असले, तरी पक्षाचे काम ते आजही निष्ठेने करीत आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीतही त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र, धुळे महापालिकेत पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षात राहून थेट आपल्याच पक्षाला आव्हान देण्याचे धाडस केले आहे. सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरुद्ध त्याच पक्षात राहून थेट उमेदवार उभे करून आव्हान देण्याचे धाडस आजवर कुणी केल्याचे दिसत नाही. परंतु आमदार गोटेंनी ते केल्यामुळेच राज्यात धुळे महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्यातील राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. 

आमदार गोटेंची रणनीती 
आमदार अनिल गोटे यांनी सत्तेत असलेल्या भाजपला दिलेले आव्हान म्हणजे उगाचच दगडावर डोके आपटून कपाळमोक्ष करण्याचे धाडस केले आहे असे नव्हे, तर त्यात रणनीती आहे हे निश्‍चित. आमदार गोटे आंदोलनाचे बाळकडू पिऊन राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे "राजकारण कशाशी खातात' हे त्यांना चांगले माहीत आहे. याच रणनीतीच्या आधारावर त्यांना आजपर्यंत यश मिळाले आहे. आमदार गोटे कसलेले मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांचे बंड पक्षाच्या दृष्टीने भविष्यात आव्हान असणार हे पक्षाच्या नेत्यांना माहिती नाही, असेही नाही. ते याबाबत जाणूनही आहेत. परंतु, अशी आव्हाने आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा समोर येणारच आहेत. प्रत्येक ठिकाणी अशी आव्हाने उभी राहणार आहेत. त्यामुळे त्याला सामोरे जावेच लागणार असल्याने पक्षानेही जास्त तडजोडीची भूमिका न स्वीकारता, आगामी आव्हानांशी लढण्याची परीक्षा म्हणून हे आव्हानही स्वीकारल्याचे दिसते. 

राज्याच्या पटलावर लक्षवेधी निवडणूक 
राज्यातील विविध निवडणुकांत पक्षाला यश मिळवून देण्यासह आंदोलनांच्या संकटातून पक्षाला बाहेर काढणारे "संकटमोचक' जलसंपदा गिरीश महाजन यांनाच पक्षाने या आव्हानाशी सामना करण्यास सज्ज केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. शिवाय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल हे त्यांच्या साथीला आहेतच. त्यामुळे त्यांचीही कसोटीच लागेल. आमदार गोटेंविरुद्धचा हा लढा भाजपने जिंकला तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षातून कोणी विरोध केल्यास त्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पक्षाला "बूस्टर' मिळेल. मात्र, अपयश आले, तर पक्षाला नवीन रणनीती आखावी लागेल. त्यामुळे गोटेंचे हे आव्हान भाजपसाठी खऱ्या अर्थाने परीक्षाच असणार आहे. यातून धुळे महापालिका निवडणूक राज्याच्या पटलावर खऱ्या अर्थाने वेगळी ठरणार, हे मात्र निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com