भारतीय जनता पक्षाचे नेते खोटारडे, थापेबाज! : राजवर्धन कदमबांडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी त्यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्‍वास ठेवू नये, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत धुळेकरांनी त्यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्‍वास ठेवू नये, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी आज "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
येथील महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीचे नेतृत्व श्री. कदमबांडे करीत आहेत. आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते कॉर्नर सभा, तसेच घरोघरी प्रचार करीत आहेत. निवडणुकीतील प्रचार मुद्यांबाबत आणि धुळे शहराच्या विकासाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 

प्रश्‍न ः धुळे शहराचा विकास झाला नसल्याचा आरोप भाजप नेते करीत आहेत? 
उत्तर ः भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलत आहेत. ते केवळ हेच काम करीत असतात. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाल्याचे सांगतात. मग त्याचे कामही का सुरू होत नाही? जलसंपदामंत्री गिरीश महाजन सुलवाडे- जामफळ उपसा सिंचन योजनेला कोट्यवधींचा निधी दिल्याची घोषणा करतात. त्याचेही काम सुरू झालेले नाही. त्याचप्रमाणे धुळे शहराचा विकास झालेला नाही, असे ते खोटे बोलत आहेत. गेल्या दहा वर्षांत शहरात विकासाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. उलटपक्षी गेल्या साडेचार वर्षांत राज्यात त्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनीच महापालिकेचा निधी रोखून विकासकामांत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण त्यावरही मात करून आमचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून निधी आणला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या खोटारडेपणाकडे जनतेने लक्ष देऊ नये. 

प्रश्‍न ः राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेच्या सत्तेत असतानाही पाणी प्रश्‍न गंभीर असल्याचा आरोप होतो? 
उत्तर ः भाजपचा हा आरोपही खोटा आहे. राज्यात गेल्या साडेचार वर्षांत भाजपची सत्ता आहे. धुळ्यात आमदार, खासदार त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांनी धुळ्यातील पाणी प्रश्‍न सुटण्यासंबंधी साधे पत्र का दिले नाही? राज्यात आमची आघाडीची सत्ता असताना धुळ्याला पाणी देण्यासाठी नियोजन केले. मात्र, धुळे शहराच्या वितरण जलवाहिन्या अत्यंत जुन्या आहेत. त्या बदलण्यासाठी तसेच नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी 136 कोटींचा निधी मी आमदार नसतानाही केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करून आणला. मात्र, त्या योजनेतही भाजप सरकारने खोडा घातला. ही योजना महापालिका पूर्ण करीत असतानाही अकारण हस्तक्षेप करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केली. त्यामुळे योजना पूर्णत्वाला विलंब लागत आहे. त्याचा परिणाम पाणी प्रश्‍न व नियोजनावर झाला. या स्थितीला खऱ्या अर्थाने हेच भाजप सरकार जबाबदार आहे. ही योजना पूर्ण झाली तर निवडणुकीत "राष्ट्रवादी'ला लोकप्रियता मिळेल. तसे होऊ नये म्हणून भाजप सरकारने योजनेच्या कामात खोडा घातला. 

प्रश्‍न ः केंद्रात व राज्यात सत्ता नसल्यामुळे "राष्ट्रवादी' महापालिकेद्वारे विकास करू शकणार नाही, असाही आरोप होत आहे? 
उत्तर ः भाजपचे नेते सत्तेच्या स्वप्नात रमलेले आहेत. त्यांनी असेच राहावे. आज देशाची हवा बदलते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशासह राज्यात मोठे परिवर्तन होणार आहे. निश्‍चितच देशात व राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या विचारांचे सरकार सत्तेवर येईल. त्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करणार आहोत. परंतु, आजही आमची केंद्रात व राज्यात सत्ता नसताना आमचे नेते शरद पवार यांच्या माध्यमातून विविध योजनांचा निधी आणून धुळे शहराचा विकास करीत आहोत. 

प्रश्‍न ः महापालिकेत "आघाडी'ला यश मिळेल? 
उत्तर ः होय नक्कीच..! आम्ही केलेल्या विविध प्रकारच्या विकासकामांच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा सत्ता देईल, याचा विश्‍वास आहे. आम्ही विकास केला नाही, असा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षानेच आमच्या पक्षाकडून महापौर, स्थायी समिती सभापती, नगरसेवक, सभागृह नेते अशा पदे भोगलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत 62 उमेदवार दिले. त्यातील मूळ भाजपचे किती? ते आमच्यासह इतर काही पक्षांतून घेतलेले आहेत. त्यांच्याच माध्यमातून आम्ही शहराचा विकास केला आहे. शहराचा विकास झाला नसता तर त्यांनी संबंधितांना भाजपमध्ये घेतले असते का, हाच खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस शहराचा विकास करतो हे आता विरोधकही मान्य करतात. जनतेचा तर आमच्यावर विश्‍वास आहेच. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला बहुमत मिळून आम्ही सत्तेवर येऊ, हा आम्हाला विश्‍वास आहे. 

प्रश्‍न ः गुंडगिरीच्या प्रश्‍नासह आरोपांबाबत आपले मत काय? 
उत्तर ः गुंडगिरीच्या मुद्याचे कुणीही समर्थन करणार नाही. भाजपमध्ये गुंड, समाजकंटक, गुन्हेगारीचा आरोप असलेल्यांना प्रवेश दिला. हे बोलतं कोण तर भाजपचे आमदार अनिल गोटे. अशा कंटकांच्या माध्यमातून मतदान वाढविणार, असे विधान करते कोण, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. देशद्रोहाचा आरोप आणि देशाला हादरविणाऱ्या बनावट मुद्रांकाच्या तेलगी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजप धुळ्यातील आमदारकीचे तिकीट देते. हे विधान करते कोण तर देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे. यावरून गुंडगिरीच्या प्रश्‍नाबाबत धुळेकरांनी काय समजावे ते समजून घ्यावे. 

प्रश्‍न ः "आघाडी'तर्फे धुळेकरांना विकासाची हमी काय? 
उत्तर ः आम्ही नागरी सुविधांची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणार आहोत. "धुळे शहर स्वच्छ आणि सुंदर शहर' हा आमचा जाहीरनामाच आहे. त्या दृष्टीने आम्ही कामे करणार आहोत. धुळ्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असणार आहे. धुळेकर आम्हाला महापालिकेत यश देतीलच. परंतु आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचा खासदार, तर विधानसभेत आमदार निवडून देतील, असाही विश्‍वास आहे. 
 

Web Title: marathi news dhule muncipal corporation election rajvardhan kadambande