हरवलेल्या ताकदीचा शिवसेनेकडून शोध

हरवलेल्या ताकदीचा शिवसेनेकडून शोध

धुळे ः "कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी एकेकाळी शिवसेनेने डरकाळी फोडत आपला दबदबा निर्माण केला होता. धुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत आपली सत्ताही स्थापन केली होती. मात्र, त्याच शिवसेनेला गेल्या 15 वर्षांत झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे यावेळच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या हरवलेल्या ताकदीचा शोध घ्यावा लागत आहे. भाजप, गोटेंचा लोकसंग्राम आणि कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या दंगलीत आपल्या आता असलेल्या संख्येपेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, यासाठीच मोठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. 
धुळे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. पहिले महापौर होण्याचा मान भगवान करनकाळ यांना मिळाला होता. त्यामुळे खानदेशात धुळ्यात शिवसेना मजबूत होती. याच बळावर शिवसेनेचे मुंबईतील नेतेही धुळ्याच्या संघटन, बळकटीचे उदाहरण इतरत्र देत असत. मात्र, कालांतराने नेमके झाले उलटेच. धुळ्यात शिवसेनेची ताकद वाढण्यापेक्षा कमी-कमी होत गेली. त्याला कारणे बरीच असल्याचे सांगितले जात आहे. परंतु महत्त्वाचे कारण म्हणजे पक्षातील अंतर्गत वाद. यामुळे पक्षाला मोठा फटका बसला. 2013 महापालिका निवडणुकीत पक्षाला केवळ 11 जागांवर विजय मिळाला. 
केंद्रात व राज्याच्या सत्तेत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाची ताकद धुळ्यात कमीच आहे. शिवसेनेपेक्षा तब्बल चार पट कमी म्हणजे केवळ तीनच नगरसेवक भाजपचे निवडून आले होते. मात्र, यावेळी केंद्रातील व राज्यातील सत्तेच्या बळावर भाजपने थेट महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. त्या तुलनेत शिवसेना मात्र सध्या तरी भाजपच्या आव्हानाच्या आसपासही दिसत नाही. हे चित्र पक्षाच्या ताकदीच्या दृष्टीने चांगले नाही. 
पक्षाचे नेते व माजी महापौर भगवान करनकाळ, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी यांच्यावरच आता पक्षाला बळकटी देण्याची जबाबदारी आहे. तसेच पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख के. पी. नाईक हे निवडणुकीचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, धुळ्यातील निवडणुकीचे चित्र पाहिल्यास भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षातच टक्कर असल्याचे दिसते. शिवसेनेला यावेळी आपली ताकद दाखविण्याची संधी आहे. पक्षाच्या नेतृत्वाने नियोजन केल्यास पक्षाला गेल्या वेळेपेक्षा आपले संख्याबळ अधिक वाढवता येईल. याच बळावर महापालिकेत त्रिशंकू स्थिती उद्‌भवली, तर सत्तेत हिस्सेदारी करून आपले बळही दाखविता येईल. याशिवाय धुळ्याच्या राजकारणात आमचीही ताकद मोठी आहे, हे सांगता येईल. 


आगामी निवडणुकांवर परिणाम 
आगामी लोकसभा निवडणुकीत त्याच बळावर उमेदवारीचा दावाही करता येणार आहे. त्यामुळे शिवसेनेला सध्या तरी आपली एकजुटता राखून महापालिका निवडणुकीत काम करावे लागणार आहे. गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळाल्या तर मात्र पक्षाच्या धुळ्यातील राजकीय अस्तित्वालाच फटका बसणार आहे. त्याची सावधानता नेते व शिवसैनिक बाळगतात काय?, हे निकालाच्या दिवशीच समजेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com