"यांची 47 वर्षांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती' : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

धुळे ः ज्यांची 47 वर्ष सत्ता होती ते अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजा जनतेला देऊ शकले नाहीत, ते आता तीन वर्षात आम्हाला प्रश्‍न विचारत आहेत. यांची 47 वर्षांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती अशी टीका अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाव न घेता केली. सरकार योग्य दिशेने निघाले आहे, प्रत्येक प्रश्‍न टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले. 
 
येथील पांझरा नदीवर झुलता पूल व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत झाले. आमदार अनिल गोटे, रजक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष बालाजीराव शिंदे, एकनाथ बोरसे, राजेंद्र खैरनार, भीमसिंग राजपूत, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, डॉ. तुळशीराम गावित, माजी महापौर मंजुळा गावित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सी. डी. वाघ, उपविभागीय अभियंता आरिफ शाह आदी उपस्थित होते. मंत्री मुनगंटीवार म्हणाले, वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांसह इतर सर्व महापुरुषांनी आपल्याला चांगला विचार दिला पण या महापुरुषांचा आपण जाती-जातील बंदिस्त करत आहोत. एका अर्थाने त्यांच्या विचारांनाच आपण नख लावत आहोत. विरोधी पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, की ज्यांची 47 वर्ष दोन महिने एक दिवस सत्ता होती, ते आता तीन वर्षात आम्हाला प्रश्‍न विचारत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या मूलभूत गरजा पुरवू न शकणारे आम्हाला आता या विषयांवर प्रश्‍न विचारत आहेत. 47 वर्षाची यांची झोप पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती असा टोलाही त्यांनी लावला. 
 
आत्महत्या त्यांची देणं 
शेतकरी आत्महत्या ही देणं कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. 2001 मध्ये 63 आत्महत्या झाल्या त्यावेळीच या आत्महत्या थांबविल्या असत्या तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. समस्या त्यांनी निर्माण केल्या आणि शिव्या मात्र आम्ही खात आहोत हे दुर्दैव आहे. शून्य शेतकरी आत्महत्या होण्याच्या दृष्टीने आम्ही एक-एक पाऊल पुढे जात आहोत. तीन वर्षात सर्व समस्या सोडविता येणार नाहीत असे म्हणत त्यांनी बेरोजगारी, पर्यावरण, जलयुक्त शिवार, गोरगरिबांसाठी पंतप्रधान आवास योजना अशा अनेक कामातून टप्प्याटप्प्याने समस्या सोडविल्या जात आहेत. सरकार योग्य दिशेने जात असल्याचेही नमूद केले.

Web Title: marathi news dhule mungantivar