धुळ्यात दुकानात मास्क न लावणाऱयांवर मनपा पथकाने केली कारवाई 

रमाकांत घोडराज
Thursday, 12 November 2020

व्यापाऱ्यांनीही दुकानांमध्ये ‘नो मास्क-नो एन्ट्री’ या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. तरीही अनेक दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन करून व्यवहार होत आहेत

 धुळे ः बाजारात ग्राहकांसह दुकानदारांनी मास्क लावा, असे वारंवार आवाहन करूनही ग्राहक, दुकानदार मास्क लावत नसल्याने महापालिकेच्या पथकाने  अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली.

पथकाने ११ दुकानदारांकडून एकूण साडेपाच हजार रुपये दंड वसूल केला. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी उपाययोजना कायम ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांना आवाहन करणे, प्रसंगी कारवाई करण्याबाबतही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी निर्देश दिले आहेत. तसेच व्यापाऱ्यांनीही दुकानांमध्ये ‘नो मास्क-नो एन्ट्री’ या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. तरीही अनेक दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन करून व्यवहार होत आहेत. अशा नियम मोडणाऱ्यांवर महापालिका व पोलिसांच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. पथकाने दोन दिवसांपूर्वी आग्रा रोड भागात नागरिक, दुकानदारांना याबाबत आवाहनही केले. मास्क न लावणाऱ्या काही नागरिकांना दंडही केला. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. गर्दीत मास्क न लावताही व्यवहार होत असल्याने अखेर बुधवारी महापालिका पथकाने काही दुकानदारांवरच दंडात्मक कारवाई केली. 

अकरा दुकानदारांना दंड 
शहरातील आग्रा रोड, पारोळा रोड भागात महापालिकेच्या पथकाने बुधवारी दुकानांमध्ये पाहणी करून ज्या दुकानात ग्राहक अथवा दुकानमालक, कर्मचाऱ्यांनी मास्क लावलेला नव्हता अशा ठिकाणी थेट दुकानदारांनाच जबाबदार धरून त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला. 
पारोळा रोडवरील ट्रेंड झोन शॉपी, तनिषा मोबाईल, आग्रा रोडवरील एन. सुजाउद्दीन फटाका, रोशनी ड्रेस मटेरिअल, स्टाईल्स रेडिमेड, महावीर ड्रेसेस, नानकाल प्रेमचंद जैन, परिधान फॅशन, गल्ली नंबर दोनमधील बैबीस वर्ल्ड, नबाव हार्डवेअर, उषा ड्रेसेस आदी दुकानदारांवर कारवाई केली. या दुकानदारांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे एकूण साडेपाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Municipal team took action against those who did not wear masks in the shop