esakal | रुग्णवाहिका आहे पण चालविणाराच नाही; रूग्‍णाचे नातेवाईक फिरून जाताय

बोलून बातमी शोधा

ambulance
रुग्णवाहिका आहे पण चालविणाराच नाही; रूग्‍णाचे नातेवाईक फिरून जाताय
sakal_logo
By
टिम इ सकाळ

पिंपळनेर (धुळे) : शहरासह परिसरात कोरोनाचा आणखी उद्रेक होण्याची भीती असतानाच आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामीण रुग्णालयास रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, मात्र रुग्णवाहिकेवर १३ दिवस उलटूनही चालक नसल्याने सेवा देणे बंद आहे. त्यामुळे रुग्णवाहिका असूनही रुग्णांचे हाल होत आहेत. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शहरासह परिसरात कोरोनाचे रोज नवे रुग्ण सापडत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गंभीर आजार असलेले रुग्ण आहेत. रुग्णांच्या ‘स्वॅब’ घेण्याच्या प्रक्रियेपासून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज असते. मृतदेह अंत्यसंस्करासाठी नेण्यासाठीही रुग्णवाहिकेची मागणी असते. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात एकही रुग्णवाहिका नसल्याने आमदार गावित यांच्या आमदार विकास निधीतून सर्व सुखसुविधा असलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण १३ एप्रिलला ग्रामीण रुग्णालयात झाले. रुग्णवाहिका शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालयाच्या स्वाधीन केली; परंतु या रुग्णवाहिकेवर १३ दिवस उलटूनही चालक नसल्याने ती रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडली आहे.

रात्री येण्यास नकार

रुग्णांचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालय व आमदार प्रतिनिधींना तासनतास फोन करूनही रुग्णवाहिका मिळत नसल्याचा रुग्णांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनाही नुकताच प्रत्यय आला. गुरुवारी (ता. २२) एका गरीब कुटुंबातील तीसवर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र ऑक्सिजन लेव्हल ७० होती. पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने त्या महिलेला घरून साक्री येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेवर चालक नसल्याने उपलब्ध झाली नाही. त्या कुटुंबातील नातेवाइकांनी आमदारांच्या प्रतिनिधींना फोन केला असता त्यांनी साक्री येथील रुग्णवाहिकेवरील चालकाचा नंबर दिला. मात्र त्या चालकाने रात्री येण्यास नकार देत सकाळी येईन, असे सांगितले. यामुळे त्या कुटुंबीयांच्या नातेवाइकांनी उसनवार पैसे करून खासगी वाहनाद्वारे साक्री येथे नेले, तर रुग्णांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करत आमदारांनी लवकरात लवकर ड्रायव्हर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.