मलिक, देशमुखांना कंटाळून बदलीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

धुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि रोहयो, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात निर्माण झालेल्या वादाला गंभीर वळण लागले. यात दोंडाईचाचे (ता. शिंदखेडा) पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी नवाब मलिक आणि माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना कंटाळून बदलीची मागणी पोलिस महासंचालकांसह जिल्हा अधीक्षकांकडे केली आहे.

विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी फळबागेच्या मोबदल्याप्रश्‍नी आत्महत्या केल्यानंतर मलिक यांनी मंत्री रावल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या प्रकरणी मंत्री रावल यांनी मलिक यांच्यावर दोंडाईचा पोलिस ठाण्यात 29 जानेवारीला मानहानी प्रकरणी गुन्हा दाखल केला. यात तरतुदीनुसार न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर दोंडाईचा पोलिसांनी तपासाविषयी कार्यवाही सुरू केली.

काय म्हणाले मलिक?
अशात नऊ फेब्रुवारीला मलिक यांनी पोलिस निरीक्षक पाटील आणि उपनिरीक्षक मोरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला आणि "एनसी'च्या प्रकरणात तपास कसा काय सुरू केला, अशा किती प्रकरणांत न्यायालयाची परवानगी घेऊन तपास केला आहे, अशी माहिती अधिकारात विचारणा करतो, तुम्ही नवाब मलिकला दोंडाईचात बोलावता का, मी तुमच्या पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसतो, त्यामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास तुम्ही जबाबदार राहाल, सत्ता बदलत राहते, हे लक्षात ठेवा, अशा आशयाची धमकी दिली. आपण माजी मंत्री असून आपले मंत्री रावल यांच्याशी भांडण आहे, असे मलिक यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मला दोंडाईचा येथे का बोलविता, मी उच्च न्यायालयात रीट दाखल करेल, अशी धमकी दिली. तसेच डॉ. देशमुख हे या- ना त्या कारणावरून प्रत्येक दैनंदिन कामात हस्तक्षेप करीत आहेत. मलिक व डॉ. देशमुख यांच्या वेळोवेळीच्या त्रासाला कंटाळून बदली करावी, अशा खळबळजनक मागणीचे पत्र पोलिस निरीक्षक पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस महासंचालकांकडे पाठविले आहे.

Web Title: marathi news dhule news hemant patil transfer demand