'कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक

जगन्नाथ पाटील
शनिवार, 8 जुलै 2017

अज्ञात व्यक्तीने चार जूनच्या रात्री तणनाशकाची फवारणी केल्याने पूर्ण मका जळाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकाराविरुद्ध वृध्द दाम्पत्याने महसुलसह पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र महिला उलटून गेला तरीही अद्याप पंचनामा झालेला नाही.

कापडणे (जि. धुळे) - पाऊस जेमतेम आहे. पंधरा दिवसांपासून पाऊस नाही. दुबार पेरणी केलेली पीके तग धरुन उभी आहेत. शेतकरी निंदणी, कोळपणी करुन पिके जगविण्याची धडपड करीत आहेत. अशा स्थितीत अज्ञात व्यक्तीने येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याच्या शेतातील अडीच एकर मका पिकावर तणनाशक मारल्याने पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. वयोवृद्ध दाम्पत्याच्या शेतात अद्याप महसुलसह पोलिस यंत्रणाही पंचनाम्यासाठी पोहचलेली नसल्याने वृद्ध दाम्पत्य हताश झाले आहे. 'कोणी न्याय देता का न्याय' अशा आर्त विनवणी करीत आहेत.

श्रीराम वामन पाटील व त्यांच्या पत्नी हे सत्तरी उलटलेले वयोवृद्ध दाम्पत्य आहे. सैन्यदलातून निवृत्त झाल्यापासून हे दांपत्य शेती कसत आहेत. न्याहळोद रस्त्यालगत व भारा नाल्याच्या काठावर त्यांची शेती आहे. नऊ जूनला त्यांनी जेमतेम पाण्यावर मक्‍याची पेरणी केली होती. तेरा जूनच्या पावसाने उगवण जोमाने झाली. त्यानंतर पावसाने ताण दिली. निंदणी आणि खुरपुणी करुन पिकाची वाढ चांगली झाली होती. अज्ञात व्यक्तीने चार जूनच्या रात्री तणनाशकाची फवारणी केल्याने पूर्ण मका जळाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकाराविरुद्ध वृध्द दाम्पत्याने महसुलसह पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र महिला उलटून गेला तरीही अद्याप पंचनामा झालेला नाही. सरपंच भटू पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, जयवंत बोरसे, शिवाजी बोरसे, अशोक बोरसे आदींना शेतावर नेते श्रीराम बोरसे यांनी जळालेल्या मकाच्या शेताला भेट दिली. यावेळी दांपत्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. यावेळी 'गावकऱ्यांनो आता तुम्ही तरी न्याय द्या', अशी आर्त विनवणी दांपत्याने केली. दरम्यान परिसरात अशा प्रकारच्या नुकसानीची पहिलीच घटना आहे.

Web Title: marathi news dhule news kapadne news justice news