पालिका निवडणूकीत शिंदखेड्याला 64,  नंदुरबारला 52, नवापूरला 39 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

राजकीय लढती नवापूर येथे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंदुरबार, शिंदखेडा येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रोमहर्षक लढत झाली. नवापूर, नंदुरबार आणि शिंदखेडा येथे काँग्रेसची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपप्रणीत सरकार असल्याने नंदुरबार, नवापूर, शिंदखेडा येथे सत्ताप्राप्तीसाठी भाजपने कंबर कसली. तर सत्ता हातून जाऊ नये म्हणून काँग्रेसने निकराची झुंज देण्याचा प्रयत्न केला.

धुळे - नवापूर, नंदुरबार पालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीअंतर्गत आज (बुधवारी) शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीनपर्यंत नंदुरबार येथे सरासरी 51.60, तर नवापूर येथे 39 टक्के, तर शिंदखेडा (जि. धुळे) येथे सरासरी 64 टक्के मतदान झाले. दुपारी साडेपाचपर्यंत मतदान सुरू होते. 

शिंदखेडा येथे वरूळ रोडवरील प्रभाग क्रमांक दहासाठी असलेल्या एन. डी. मराठे हायस्कूलमधील आदर्श मतदान केंद्रात मतदारांच्या स्वागतासाठी हायस्कूलच्या प्रवेशव्दारापासून ग्रीन कार्पेट, तर मतदान केंद्रात रेड कार्पेट टाकण्यात आले. टेबल, खुर्च्यांवर गालिचा दिसून आला. तसेच पहिल्या दहा मतदारांचे विविध रोपे देऊन निवडणूक यंत्रणेने स्वागत केले. राजकीय लढती नवापूर येथे काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंदुरबार, शिंदखेडा येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रोमहर्षक लढत झाली. नवापूर, नंदुरबार आणि शिंदखेडा येथे काँग्रेसची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपप्रणीत सरकार असल्याने नंदुरबार, नवापूर, शिंदखेडा येथे सत्ताप्राप्तीसाठी भाजपने कंबर कसली. तर सत्ता हातून जाऊ नये म्हणून काँग्रेसने निकराची झुंज देण्याचा प्रयत्न केला. यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांसह अन्य काही मंत्री, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या प्रचार सभांनी वातावरण तापविले.  

नंदुरबार पालिका 
नंदुरबार पालिकेसाठी 19 प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सहा, तर नगरसेवकपदाच्या 39 जागांसाठी 112 उमेदवार रिंगणात होते. शहरातील 126 केंद्रांवर मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, भारतीय जनता पक्षाचे डॉ. रवींद्र चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुष्पा थोरात, अपक्ष प्रकाश भोई, राकेश मराठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आरिफ शेख, 'एमआयएम'चे रफत हुसेन रिंगणात होते. यात एक लाख 264 मतदार आहेत. दुपारी साडेतीनपर्यंत सरासरी 51.60 टक्के मतदान झाले. 

नवापूर पालिका 
नवापूरला दहा प्रभागातून नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवकांच्या 20 जागांसाठी 95 उमेदवार रिंगणात होते. यासाठी 38 मतदान केंद्र उपलब्ध होते. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या हेमलता पाटील, भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या प्रा. ज्योती जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. अर्चना वळवी, शहर विकास आघाडीच्या सोनल पाटील, समाजवादी पार्टीच्या अजमिना शेख, बहुजन समाज पक्षाच्या संगीता सावरे रिंगणात होत्या. यात 28 हजार 791 मतदार होते. पैकी 11 हजार 251 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी साडेतीनपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान झाले. 

शिंदखेडा नगरपंचायत 
शिंदखेडा येथे 17 प्रभागात नगराध्यक्षपदासाठी चार, तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 69 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शहरात 27 मतदान केंद्रावर मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे रजनी वानखेडे, काँग्रेसतर्फे मालती देशमुख, शिवसेनेतर्फे लता माळी आणि समाजवादी पक्षातर्फे बिसमिल्लाबी गुलाम हुसेन रिंगणात होते. यात 20 हजार 289 मतदार असून पैकी दुपारी साडेतीनपर्यंत 12 हजार 963 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हे प्रमाण सरासरी 64 टक्के आहे. 

शिंदखेडा येथे गुरुवारी (ता. 14) सकाळी दहानंतर नवीन प्रशासकीय इमारतीत मतमोजणी प्रक्रीया होईल. नंदुरबार, नवापूर पालिकांसाठी 18 डिसेंबरला सकाळी दहापासून मतमोजणी होईल. नंदुरबारला इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, तर नवापूरला तहसील कार्यालयात मतमोजणी होईल. चुरशीच्या लढतीतील निकालाकडे सर्वांचे लक्ष असेल. 

 

Web Title: Marathi News Dhule News municiple corporation Elections