आजीचा स्‍कोर होता २२; ऑक्सिजनविना घरीच कोरोनावर मात!

आजीचा स्‍कोर होता २२; ऑक्सिजनविना घरीच कोरोनावर मात!
corona fight
corona fightcorona fight

दुसाणे (धुळे) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः कहर केला आहे. रोज नव्या रुग्णांची भर तसेच मृत्यूने ही परिस्थिती गंभीर होत आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांसह तरुणांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र अशा भयावह परिस्थितीतही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व प्रतिकारशक्तीच्या बळावर ८६ वर्षीय आजीबाईने घरीच औषधोपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे.

साक्री तालुक्यातील बळसाणे येथील (कै.) एन.पी.जी. विद्यालय व उच्च महाविद्यालयात कार्यरत प्रा. आर. बी. पटेल यांच्या आई रियादबी पटेल (ह.मु. दोंडाईचा) यांना काही दिवसांपूर्वी थंडी वाजून आली व ताप यायला लागला. प्रा. रशीद पटेल यांनी शहरातील खासगी रुग्णालय गाठले. तेथील डॉक्टरांनी कोविडची तपासणी करावयास सांगितले. तीन दिवसांनंतर आजीबाईंचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

स्‍कोर होता २२

ऑक्सिजन कमी असल्यामुळे आजीबाईंना मित्राने जैन रुग्णालयात दाखल केले. आजीची परिस्थिती गंभीर आहे, रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार नाही, तुम्ही ऑक्सिजन बेड शोधा, मी आपल्याला रात्रीसाठी ऑक्सिजनची सोय करतो, असा धीर दिला. कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सीटी स्कॅनला पाठविले. त्यात आजीचा स्कोर चक्क २२ आला. यामुळे तुम्ही कोविड सेंटरला जा, ऑक्सिजन बेड मिळाला तर आजींना कोव्हिड सेंटरलाच उपचारासाठी दाखल करा, ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

ऑक्‍सिजन नसल्‍याने केली सुटी

आजीची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना आजींनी त्याच रुग्णालयात रात्र काढली. मित्र व नातेवाइकांनी ऑक्सिजन मिळण्यासाठी खूप मेहनत केली; परंतु त्यांचा हिरमोड झाला अन् रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने डॉक्टरांनी आजीला सुटी दिली. तत्पूर्वी घरीच ऑक्सिजनची सोय केली. शहरातील निर्मल रुग्णालयाचे डॉ. नीलेश पवार आजींसाठी देवदूत ठरले. त्यांनी आजींचा उपचार घरीच करू, अशी संमती देत आजीला बारा दिवसांपर्यंत सकाळ, दुपार व रात्री न विसरता कंपाउंडर घरी येऊन आयव्ही व इंजेक्शन देत आजीला कोरोनापासून लवकर मुक्त होणार आहात, काळजी करू नका, तुमच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा होत आहे, असे सकारात्मक सांगत राहिल्याने आजीच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा झाल्याचे पटेल परिवाराने सांगितले.

आईचा सीआरपी ४२, एच.आर.सी.टी. स्कोर २२, ऑक्सिजन ७० आणि वय ८६ अशा भयावह परिस्थितीत आईने मला धीर दिला. माझी आई अशिक्षित परंतु आईने मला भरपूर ऑक्सिजन कसा प्राप्त होईल या बाबींकडे स्वतःहोऊन लक्ष केंद्रित केले. अनुलोम विलोम, पोटावर झोपणे, नियमितपणे व्यायाम करीत स्पाइरो मीटरचा वापर करून ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यास मदत झाली. आज आईच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे समाधान आहे.

-आर. बी. पटेल, माध्यमिक शिक्षक (बळसाणे)

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com