RameshSingh Pardeshi
RameshSingh Pardeshi

धुळे: 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक परदेशी यांची आत्महत्या

धुळे : 'एलसीबी'चे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी (वय 58) यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर पाऊणच्या सुमारास राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परदेशी कुटुंबाला मोठा धक्का बसला, तर जिल्हा पोलिस यंत्रणा सुन्न, अबोल झाली.

परदेशी यांची आत्महत्या या माहितीवर आणि अनपेक्षित घटनेवर कुणीही विश्वास ठेवायलाच तयार नव्हता. रात्री दीडनंतर शहरात वाऱ्यासारखी ही माहिती पसरली आणि खात्री करण्यासाठी अनेक जणांनी पालेशा महाविद्यालय रोडवरील आणि जुन्या 'एसआरपी' मैदानासमोर असलेल्या पोलिस क्वॉटरमधील परदेशी यांच्या निवासस्थानाजवळ गर्दी केली. 

हॉटेल व्यवसायाचे नियोजन 
परदेशी बुधवारी सकाळी नाशिकला गेले होते. ते मेमध्ये निवृत्त होणार असल्याने विवाहित मुलगा अमोलसह नाशिक येथे एका ठिकाणी कर्ज उभारूनही थ्री स्टार हॉटेल व्यवसायास सुरुवात करणार होते. त्याचे बांधकाम सुरू आहे. 

नाशिकहून परतल्यावर काम
नाशिकमधील काम आटोपून ते सायंकाळी धुळ्यात परतले. नंतर त्यांनी पांझरा नदीकाठी झालेला किरकोळ वाद सहकाऱ्यांच्या मदतीने मिटवीला. तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही सहकाऱ्यांना परदेशी हे आत्महत्या करतील अशी पुसटशी कल्पनाही आली नाही. 

पत्नीचा हंबरडा, आक्रोश
ते रात्री घरी होते. मध्यरात्रीनंतर पाऊणला पत्नी घरात असतानाच परदेशी यांनी रिव्हॉल्वरने उजव्या कानाजवळून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यात त्यांचा डोक्याचा मागचा भाग छिन्नविच्छिन्न झाला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे व भेदरलेल्या परदेशी यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केली. याही स्थितीत शेजारच्या घरी जात त्यांनी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी सपकाळ याना घटनेची माहिती देण्याचा प्रयत्न केला. 

घराजवळ पोलिस दाखल
गोळीबराचा आवाज, हंबरडा, आरडाओरड ऐकून सपकाळे हे परदेशी यांच्या निवासस्थानाकडे धावले. मात्र, मृत परदेशी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह अन्य सर्व पोलिस अधिकारी, अनेक महिला व पुरुष कर्मचारी परदेशी यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

घटनेचा मोठा धक्का
परदेशी यांच्या पत्नीचा आक्रोश थांबत नव्हता. रात्री पाऊणनंतर परदेशी यांचा मृतदेह जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. नंतर त्यांचे नातेवाईक येऊ लागले. परदेशी 1992 ला देवपूर ठाण्यात उपनिरीक्षक होते. मोहाडी,   आझादनगर व जलनासह ठिकठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती. ते मितभाषी, लोकप्रिय होते. धुळ्यातील अनेक घटना त्यांनी खुबीने नियंत्रित केल्या होत्या. असे असताना त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप पुढे येऊ शकलेले नाही. या घटनेचा परदेशी परिवारासह पोलिस यंत्रणेला मोठा धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, अधिकारी मुलगी व  अधिकारी जावई, असा परिवार आहे.

'टेंशन' कुणाला नसते...
'टेंशन' कुणाला नसते...मग कशासाठी ते घ्यायचे..कशासाठी टोकाचे पाऊल उचलले, असे परदेशी यांच्या पत्नी अश्रू अनावर होत असताना बोलत होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com