निमातर्फे धुळ्यातही ‘इम्युनिटी क्लिनिक' 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

आयुष टास्क फोर्स महाराष्ट्र शासन आणि निमा महाराष्ट्र राज्य शाखा संलग्नित निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक (NAIC) संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येत आहेत. राज्यात आत्तापर्यंत जवळपास ४०० क्लिनिकचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाइन उद्घाटन केले-

धुळे : कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी डॉक्टरांची निमा संघटना आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक ही अभिनव संकल्पना राबवत आहे. राज्यात चारशे क्लिनिकचे उद्घाटन झाले असून धुळे शहरातही देवपूर भागात क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. 

आयुष टास्क फोर्स महाराष्ट्र शासन आणि निमा महाराष्ट्र राज्य शाखा संलग्नित निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक (NAIC) संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येत आहेत. राज्यात आत्तापर्यंत जवळपास ४०० क्लिनिकचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर धुळे निमातर्फे शहरातील देवपुर भागात वैद्य नितल शंतनू पाटील यांच्या सिद्धांशआयुर्वेद चिकित्सालय (जयहिंद चौक) येथे आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकचे औपचारिक उद्घाटन झाले. एमसीआयएम सदस्य डॉ. एस. टी. पाटील, केंद्रीय निमाचे उपाध्यक्ष डॉ. जगदीश देशमुख, राज्य निमाचे उपाध्यक्ष डॉ. दीपक पाटील, विभागीय सचिव डॉ. योगेश पाटील, निमा धुळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, डॉ. हेमंत भदाणे, डॉ. अमित खैरनार, राज्य सचिव वुमन्स फोरम डॉ. राजश्री शिरपुरकर, अध्यक्ष वुमन्स फोरम डॉ. संगीता गिंदिडिया, डॉ. सौख्या चिंगरे, डॉ. गौरी खैरनार आदी उपस्थित होते. 

आणखी चार क्‍लिनिक
नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना समोर आली. या क्लिनिकमध्ये येणाऱ्या व्यक्तीची प्रश्‍नावलीद्वारे संपूर्ण माहिती घेऊन प्रकृती परीक्षण व इम्युनिटी स्कोर निश्‍चित करण्यात येईल. आयुर्वेदिक औषधे देऊन, जीवन पद्धतीतील बदल, व्यायाम व योगाभ्यास याचे मार्गदर्शन करण्यात येईल. दोन महिन्यात किमान चार वेळा संबंधित व्यक्तीच्या प्रतिकार क्षमतेची चाचणी होईल. शहरातील नागरिकांसाठी ही सेवा ना- नफा, ना- तोटा या तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. शहरात आणखी चार ठिकाणी असे क्लिनिक सुरू करण्यात येतील, नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे निमाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule nima open immunity clinic