धुळ्यात स्वतंत्र रूग्णालयाचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या आज 267 वर पोहोचली आहे. अशा रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे, त्यांना क्वारंटाईन करण्याचा भार असतो. या सर्वच प्रक्रियेत चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयावर सर्वाधिक भार येत आहे.

धुळे : चौथ्या "लॉक डाउन'नंतर जिल्ह्यातील गतीने वाढती कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या चिंताजनक आहे. पंधरा दिवसांत किंवा त्यानंतर ही संख्या आणखी वाढीची शक्‍यता वर्तविली जाते. या स्थितीत कोविड आणि नॉन कोविड म्हणजेच कोरोनाग्रस्त आणि ते वगळून इतर आजारांच्या रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णालयाव्दारे सेवेचा निर्णय झाला. मात्र, तो पुन्हा स्थगीत ठेवण्यात आला. हा तिढा कायम असल्याने नेमकी माशी शिंकतेय कुठे? याचा विविध पातळीवरून शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यात कोविड रूग्णांची संख्या आज 267 वर पोहोचली आहे. अशा रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे, त्यांना क्वारंटाईन करण्याचा भार असतो. या सर्वच प्रक्रियेत चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयावर सर्वाधिक भार येत आहे. ते लक्षात घेता जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा शासकीय रूग्णालय (सिव्हील), शिरपूर, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय, तसेच काही ग्रामीण रूग्णालयात कोविडसंबंधी रूग्णांचे नमुने तपासणीसाठी घेणे, उपचारासाठी दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे काहीअंशी हिरे महाविद्यालयाचा भार कमी झाला.

मात्र, हिरे महाविद्यालयात कोविडसह नॉन कोविड म्हणजेच प्रसूती, अपघातासह इतर आजाराच्या रूग्णांचा भार कायम आहे. या स्थितीत कमी मनुष्यबळात अशा सर्व प्रकारच्या रूग्णांना सेवा देताना हिरे महाविद्यालयाची ओढाताण होते. तसेच कोविड व नॉन कोविडसंबंधी रूग्णांचे नातेवाईक महाविद्यालयासह संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात ये- जा करीत असतात. ही संसर्गजन्य कोरोना आजारामुळे धोक्‍याची स्थिती मानली जाते. या स्थितीत हिरे महाविद्यालयाचे जिल्हा रूग्णालय केवळ कोविड रूग्णांसाठी, तर जवाहर मेडिकल फाउंडेशनचे खासगी रूग्णालय इतर सर्व आजाराच्या रूग्णांसाठी वापरात आणण्याचा निर्णय जिल्हाधिकारी, वैद्यकिय यंत्रणेच्या संयुक्त बैठकीत झाला. दोन दिवसांपूर्वी ही घोषणा होतानाच हिरे महाविद्यालयाच्या रूग्णालयातून "कोरोना'चे वगळता इतर सर्वच रूग्ण लागलीच स्थलांतरीत करणे अडचणी होते. त्यामुळे जवाहर रूग्णालयात प्रथम प्रसूती, मेडिसीनसंबंधीत रूग्णांचे स्थलांतर करावे. त्यांच्यासह नंतर टप्प्याटप्प्याने इतर रूग्णांना उपचारासाठी सुविधा दिली जावी, असे ठरले. परंतु, मंत्रालयातून अशा स्वतंत्र रूग्णालयाची सुविधा करता येणार नाही, असा निरोप आला. त्यामुळे असा झालेला निर्णय स्थगीत ठेवण्यात आला. यात राजकीय हस्तक्षेप, वैद्यकिय मंत्रालयातील राजकारण की अन्य काही कारण आहे? याचा विविध पातळीवरून शोध घेतला जात आहे.

 

दोन महिन्यात 21 बैठका

कोविड व नॉन कोविड रूग्णांसाठी स्वतंत्र रूग्णालय असावे, असा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी मांडण्यात आला. त्याबाबत स्थानिक पातळीवर आतापर्यंत 21 बैठका झाला. चर्चेचे गुऱ्हाळ चालले. मात्र, अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. भविष्यात रूग्णसंख्या वाढतच गेल्यास हा भार हिरे महाविद्यालयाचे रूग्णालय, तसेच अपुरी सोय असलेले सिव्हील हॉस्पिटल पेलू शकेल काही नाही हा प्रश्‍नच आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule no separate civil hospital in corona peried