esakal | धुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली, दर घसरले !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली, दर घसरले !

प्रतिक्विंटल सरासरी तीनशे ते चारशे रुपयांनी कांद्याचा दर कोसळला. समितीत दिवसभरात साडेसतराशे क्विंटल कांद्याची आवक झाली.

धुळे बाजार समितीत कांद्याची आवक घटली, दर घसरले !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे: केंद्राच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याने पुन्हा शेतकऱ्यांचे अश्रू काढले आहेत. या निर्णयामुळे येथील बाजार समितीत बुधवारी (ता. १६) आवक घटली आणि दर कोसळले. निर्यातबंदीविरोधात सर्वत्र रान उठल्याने केंद्र सरकार काय निर्णय घेते आणि बंदी मागे घेण्याचा सकारात्मक निर्णय झाला, तर विक्रीतून दोन पैसे जास्ती पदरात पडतील, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीत कांदा विक्रीस आणला नाही. 

धुळे बाजार समितीत सोमवारी (ता. १४) कांद्याच्या सहा हजार तर तत्पूर्वी, शुक्रवारी दहा हजार गोणींची आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार ८०० रुपयांपर्यंत दर होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर बाजार समितीत बुधवारी केवळ साडेतीन हजार गोणी कांद्याची आवक झाली. तसेच प्रतिक्विंटल सरासरी तीनशे ते चारशे रुपयांनी कांद्याचा दर कोसळला. समितीत दिवसभरात साडेसतराशे क्विंटल कांद्याची आवक झाली.

कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते २५०० रुपये दर होता. दोन हजार तीनशे, दोन हजार चारशे नंतर तो पंचवीसशेवर स्थिरावला. येत्या दोन दिवसांत केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. बाजार समितीत कांद्याच्या व्यवहारातून बुधवारी सरासरी ३० ते ३२ लाखांची आर्थिक उलाढाल झाली. उत्तर महाराष्ट्रातून येथे कांदा विक्रीस आला. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला, तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघू शकेल. अन्यथा, कांदा त्यांना पुन्हा रडविल्याशिवाय राहणार नाही.  

संपादन- भूषण श्रीखंडे