esakal | धान्य बँकेचा धुळे पॅटर्न राज्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

grain bank

‘लॉकडाउन’मध्ये दोन वेळची भूक कशी भागवावी, अशा विवंचनेतील कुटुंबांचे प्रश्‍न ‘माविम’चे जिल्हा समन्वयक हेमंत भदाणे यांना समजले. यातून सुटकेसाठी श्री. भदाणे यांनी धान्य बँकेची संकल्पना राबविली.

धान्य बँकेचा धुळे पॅटर्न राज्यात 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : दुष्काळी स्थिती, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत गरीब, गरजू वर्गाची ससेहोलपट होते. त्यांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते. प्रसंगी खासगी सावकाराकडून पैसे घेऊन अन्नाचा प्रश्‍न सोडवावा लागतो. पुढे मुद्दल अन्‌ व्याज फेडावे कसे, या विवंचनेत हा वर्ग सापडतो. यावर उपाय म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धुळे जिल्हा कार्यालयाने धान्य बँकेची यशस्वी संकल्पना राबविली. त्याचा हा धुळे पॅटर्न राज्यात राबविण्याची तयारी सुरू आहे. 
‘लॉकडाउन’मध्ये दोन वेळची भूक कशी भागवावी, अशा विवंचनेतील कुटुंबांचे प्रश्‍न ‘माविम’चे जिल्हा समन्वयक हेमंत भदाणे यांना समजले. यातून सुटकेसाठी श्री. भदाणे यांनी धान्य बँकेची संकल्पना राबविली. आदिवासी बहुल साक्री व शिरपूर तालुक्यात, तसेच इतर काही गावांत महिलाही शेतीतून गहू, बाजरी, ज्वारी पिकवितात. काही धान्य घरी साठवतात, तर इतर विक्री करतात. काही आपत्ती आली तर धान्याच्या तुटवड्यामुळे संबंधित कुटुंबाला उपासमारीला सामोरे जावे लागते. संकटकाळात मग खासगी सावकार गैरफायदा घेतो. 

जबाबदारीचे वाटप 
या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात हिसाळे, जामन्यापाडा, कोडीद, वाडी, चाकडू, साक्री तालुक्यात शिरसोले, चिंचपाडा, मळखेडा, धुळे तालुक्यात गरताड, रतनपुरा, मुकटी येथे धान्य बँक स्थापन झाली. गावस्तरावर महिलांची समिती स्थापन झाली. प्रत्येक गाव बँकेत सरासरी ४० ते ५० महिला सदस्य आहेत. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार दहा ते १५ किलो धान्य निर्धारित कालावधीत संकलित होते. ते बांबूपासून तयार केलेल्या कोठारात साठविले जाते. कीड लागू नये, तसेच देखरेख, व्यवहाराची जबाबदारी समितीतील सहनियंत्रक महिलांकडे असते. दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेल्या महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे धान्य बँक पाहून प्रभावित झाल्या. त्यांनी राज्यात धुळे धान्य बँक पॅटर्न राबविण्याची घोषणा केली. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जात आहे. त्याजोडीला व्हेजिटेबल बँक राबविण्याचा निर्णय सौ. ठाकरे यांनी घेतला. 

...अशी चालते धान्य बँक 
आपत्तीत धान्याची गरज असलेल्या महिलेला सरासरी दहा किलो धान्य दिले जाते. गरजेनुसार वाढीव प्रमाण असते. नंतर धान्याचा परतावा करताना संबंधित महिला सरासरी दहा किलोमागे निर्धारित व्याजानुसार तीन किलो धान्य देते. म्हणजेच दहा अधिक तीन, असा १३ किलो धान्याचा परतावा होतो. 

लॉकडाउनच्या कालावधीत धुळे जिल्ह्यातील धान्य बँक गाव क्षेत्रात एकूण २५० महिलांनी लाभ घेत उपासमारी टाळली. ही संकल्पना यशस्वी ठरल्याने जिल्ह्यात २५ गावांमध्ये ही बँक स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. 
-हेमंत भदाणे, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ (धुळे)