त्या अपघातानंतरचे दृश्‍य हृदय हेलावणारे 

dhule pickup van accident
dhule pickup van accident

धुळे : पोटापाण्यासाठी मध्य प्रदेशातून धुळेमार्गे उस्मानाबाद येथे जाणाऱ्या ऊसतोड मजुरांची पिक-अप व्हॅन धुळे- चाळीसगाव मार्गावरील विंचूर (ता. धुळे) शिवारातील बोरी नदीच्या पुलावरून 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. यात आठ ठार, तर 18 मजूर जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतरचे दृश्‍य प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकणारे ठरले. अपघातातील मृतांमध्ये बहुसंख्येने लहान मुले व महिलांचा समावेश असल्याने हा अपघात अधिकच चटका लावणारा ठरला. 
दरम्यान, अपघातात सापडलेल्या आर्य व बारेला कुटुंबांतील या ऊसतोड मजुरांवर काळाने मोठा घाला घातला. प्रवासात आर्य व बारेला कुटुंबीयांमध्ये भविष्यातील सुखकर जीवनाच्या स्वप्नांचा क्षणार्धातच चक्‍काचूर झाला. अपघातातील लहान मुलांच्या किंकाळ्या, आवाज व वेदनेचा हुंकार प्रत्येकाचे मन हेलावणारा ठरला. 
मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्‍यातील धौलगिरी येथील आर्य व बारेला कुटुंबांतील ऊसतोड मजूर कुटुंबासह पिक- अप व्हॅनने (एमएच25/टी3770) उस्मानाबादकडे जात असताना त्यांच्यावर विंचूर शिवारातच काळाने घाला घातला. शुक्रवारची रात्र ही या मजुरांसाठी जणू काळरात्रच ठरली. धुळे- चाळीसगाव महामार्गावरील विंचूर शिवारात मध्यरात्री एकच्या सुमारास बोरी नदीच्या पुलावरून वाहनचालक सागर तांबारेचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन थेट 50 फूट खोल नदीपात्रातील खडकावर आदळली. यात आठ जण ठार झाले, तर 18 जण जखमी झाले. मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर जखमींच्या किंचाळ्यांचा आवाज इतका भेसूर होता की, विंचूर गावातील ग्रामस्थांच्या कानी तो पडत होता. यानंतर ग्रामस्थांनी पुलावर एकच गर्दी केली. ग्रामस्थांनी वेळ न दवडता तत्काळ तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले व तातडीने बचावकार्याला गती दिली. 

रुग्णवाहिकाचालक, डॉक्‍टर देवदूत 
बोरी नदीपात्रात पिक-अप व्हॅन कोसळली होती. मध्यरात्रीच्या वेळी अंधारात कोणीही नदीपात्रात उतरण्यास धजावत नव्हते. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमींना बाहेर काढण्यासाठी सारेच उतरले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील चार, तर चाळीसगाव येथील एक अशा पाच रुग्णवाहिकांच्या मदतीने मृत व जखमींना बाहेर काढून धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेचे चालक सचिन थोरात, शाहरुख पठाण यांनी यात विशेष कामगिरी बजावली. सचिन व शाहरुख यांनी अंधारात जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरून व्हॅनमधील अडकलेले मृतदेह व जखमींना तत्काळ बाहेर काढून काहींचे प्राण वाचविण्यात हातभार लावला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील, डॉ. प्रमोद बोरसे, डॉ. राजेश लाटे, डॉ. निलेश चव्हाण यांनीही जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. 

सुरक्षा दलाच्या जवानांचे योगदान 
मृत व जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. अशा परिस्थितीत रुग्णालयातील सुरक्षा दलाच्या जवानांनीही माणुसकीची प्रचिती देत जखमींवर उपचार सुरू असताना त्यांना रुग्णालयातील कपडे व लहान मुलांना बिस्कीट पुडे देऊन माणुसकी जपली. सुरक्षा दलाचे अधिकारी राजेंद्र पवार, जवान प्रशांत पाटील, ज्ञानेश्‍वर आल्लोर, अतुल रोकडे, समाधान राठोड, संदीप देवरे, विजय पाटील, विशाल वाघ, संतोष भोई राजेश चव्हाण, सागर जाधव यांचा मदतीसाठी तत्परता दाखविली. 


पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांचीही मदत 
अपघाताची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस हवालदार राकेश दयाराम शिरसाट व अमोल मोहन कापसे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी अंधारात नदीपात्रात उतरून जिवाची पर्वा न करता मदत सुरू केली. त्यांच्या मदतीसाठी काही तरुण पुढे सरसावले. मात्र, अनेकांनी दुरूनच गंमत बघण्यात धन्यता मानली. काहींनी तर घटनेचे मोबाईलमध्ये चित्रकरण करत बघ्याची भूमिका घेतली. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांसह काही तरुणांनी रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह बाजूला काढून जखमी 14-15 महिला, पुरुष व मुलांना खांद्यावर टाकून ऍम्ब्युलन्सपर्यंत पोहोचविले. विंचूर येथील युवक नाना रमेश देसले याने रुग्णवाहिकेत काही जखमींना नेलवे. यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत झाली. या देवदूतांचे परिसरात कौतुक होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com