धुळ्याची "सुरत' बदलवणार : पंतप्रधान मोदी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत' बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. 

धुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला गेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची साथ हवी. तसेच आज ज्या सेवासुविधांच्या उपलब्धतेसह विकास प्रकल्पांचेई-भूमिपूजन, उद्‌घाटन झाले. त्याद्वारे येत्या तीस वर्षांत धुळ्याची "सुरत' बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. 
येथील मालेगाव रोडवरील गो-शाळेच्या खुल्या जागेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी सव्वातीनला सभा झाली. राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, ए. टी. पाटील, डॉ. हीना गावित, महापौर चंद्रकांत सोनार व्यासपीठावर होते. 
 
धुळेकरांचा मिळविला होकार 
सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. त्याच्या साक्षीने धुळ्यासह खानदेशच्या भविष्यातील विकासाची गुंफण पंतप्रधान मोदी यांनी केली. त्यांनी "धुळ्याचे सुरत होण्यासाठी अपेक्षित आत्मविश्‍वास धुळेकरांमध्ये आहे ना, धुळे पुढे जाऊ शकते ना, सुरतसारखे शहर बनू शकते ना, आगामी तीस वर्षांचा धुळे जिल्हा विकासाचा आराखडा केला तर तो स्वीकारणार ना, या दिशेने वाटचाल करणार ना', यावर जनसमुदायाकडून होकार मिळवत सर्वांसोबत राहण्याची ग्वाही दिली. 
 
मोदींची विकासाबाबत साद 
पंतप्रधान मोदी म्हणाले, की धुळ्याच्या विकासासाठी अब्जावधीच्या निधीतून साकारणाऱ्या योजनांचे लोकार्पण, पायाभरणी, उद्‌घाटन झाले. पाणी, सिंचन, दळणवळणाच्या रेल्वे, महामार्गासारख्या सोयीसुविधांमुळे धुळ्याचा सुरतसह देशातील "कनेक्‍ट' वाढणार आहे. तो औद्योगिक विकास, व्यापारवृद्धी आणि रोजगारनिर्मितीसाठी पूरक ठरणार आहे. जिल्ह्याची या क्षेत्रात विकास साधण्याची पुरेपूर क्षमता आहे. ती आणखी मंजूर विकास प्रकल्प, योजनांमुळे आणखी सशक्त होणार आहे. मनमाड- इंदूर रेल्वे मार्गाअंतर्गत धुळे- नरडाणा रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी आज झाली. भविष्यात हा मार्ग मनमाड- इंदूरला जोडला जाईल. त्यासाठी नऊ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. धुळे विकासाचा हा राजमार्ग पूर्ण झाल्यावर इंदूर ते मुंबईपर्यंत आणि देशातील कानाकोपऱ्यापर्यंत या जिल्ह्याला पोहोचता येईल. उधना- जळगाव, उधना- नंदुरबार, उधना- पाळधी रेल्वे, भुसावळ ते बांद्रा (खानदेश एक्‍स्प्रेस) या रेल्वे सुविधा आज राष्ट्राला अर्पण झाल्या. त्यामुळे देशाशी "कनेक्‍टिव्हिटी' वाढून विकासाला चालना मिळेल. 
 
सिंचनासाठी पुढाकार 
धुळे जिल्ह्यातील तापी नदी ही जीवनवाहिनी असली तरी तिच्या क्षेत्रात दुष्काळ, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तिष्ठत राहावे लागते, अशी खंत व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, की धुळे शहरालाही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ते लक्षात घेता केंद्र सरकारने अमृत योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेतला. या सिंचन योजनेंतर्गत रखडलेले 99 प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला. त्यात महाराष्ट्रातील 26 प्रकल्पांचा समावेश असून 35 वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात 21 कोटींच्या किमतीचा व सद्यःस्थितीत पूर्ण झालेला अक्कलपाडा सिंचन प्रकल्प आज 550 कोटींच्या खर्चावर पोहोचला. याप्रमाणे महाराष्ट्रात रखडलेली प्रकल्प पूर्ण करणे व दुष्काळ निर्मूलनासाठी 14 हजार कोटींचा निधी दिला आहे. असे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या राज्यात पावणेचार लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकेल. केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या विकासासह शेतकरी, पशुपालक, आदिवासी, गरीब, गरजू रुग्णांच्या पाठीशी आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आयुष्यमान भारत योजनांच्या लाभाची माहिती दिली. आयुष्यमान भारत योजनेत आतापर्यंत देशात बारा लाख, महाराष्ट्रातील 70 हजार, धुळे जिल्ह्यातील अठराशे रुग्णांनी लाभ घेतल्याचे ते म्हणाले. 
 
मोदींची अहिराणीतून साद 
व्यासपीठावर भाषणासाठी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिराणीतून संवाद साधत जनसमुदायाची मने जिंकली. "आठे जमेल तमाम खानदेशना भाऊ- बहिणीसले मना मनःपूर्वक नमस्कार. तुम्ही इतला लोके मले आशीर्वाद देवाले उनात. त्यास्ना मी आभारी शे. आठे ना लोकेस्ना जिव्हाळ्याना प्रकल्पांकरता सहभागी हुई राहीनू. त्याना आनंद शे', असे मोदी यांनी म्हणताच त्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने जनसमुदायाने प्रतिसाद दिला. 
 
या प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण... 
* सुलवाडे- जामफळ सिंचन योजना 
* अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना 
* धुळे- नरडाणा नवीन रेल्वे मार्ग 
* नंदुरबार- उधना मेमू रेल्वे 
* उधना- पाळधी मेमू रेल्वे 
* जळगाव- मनमाड तिसरा रेल्वे मार्ग 
* भुसावळ- बांद्रा रेल्वे (खानदेश एक्‍स्प्रेस) 
* जळगाव- उधना दुहेरीकरण, विद्युतीकरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule PM modi