हे प्रथमच घडले; डाळिंब घ्‍यायला बांग्‍लादेशी आले थेट बांधावर

दगाजी देवरे
Sunday, 6 September 2020

डाळिंब शेतीत वेगळेपण टिकवण्यात भामरे बंधू यशस्वी झाले. अति पावसामुळे खरिप पिकांसह भाजीपाला व फळ शेती अडचणीत सापडली आहे. सध्या खानदेशातच काय नाशिक जिल्ह्यातही डाळिंब शेती नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडली आहे.

 
म्हसदी (धुळे) : जागतिक आर्थिक मंदी आणि कोरोनाचा संकट काळ असताना काळगाव (ता.साक्री.जि.धुळे) येथील फळ पिक डाळिंबाची ‘परदेशी वारी’ भाव खाऊन जात आहे. कोलकत्ता, पाटणासह बांगलादेशातील व्यापारी शेताच्या बांधावर डाळिंब खरेदी करत आहेत. प्रथमच लिलाव पध्दतीने डाळिंबाने शंभरी पार केली आहे. 

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात डाळिंब पिक नैसर्गिक संकटांना तोंड देत असते. परंतु काळगाव (ता.साक्री) कृषीभुषण संजय निबांजी भामरे व डाळिंब रत्न राजेंद्र निबांजी भामरे या शेतकऱ्यांनी संघर्ष करत नैसर्गिक आपत्तीला तोंड देत फळाची प्रत दर्जेदार ठेवली. जूनपासून अतिवृष्टीचा पावसाळा असल्याने इतरत्र डाळिंब बागावर तेल्या, प्लेग, खरडा रोगाने कहर केला. यावर मात करत डाळिंब शेतीत वेगळेपण टिकवण्यात भामरे बंधू यशस्वी झाले. अति पावसामुळे खरिप पिकांसह भाजीपाला व फळ शेती अडचणीत सापडली आहे. सध्या खानदेशातच काय नाशिक जिल्ह्यातही डाळिंब शेती नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडली आहे.

प्रथमच थेट बांधावर लिलाव...
शेतात माल पिकवून विक्रीसाठी वणवण फिरण्याची वेळ येते. सध्या आवक कमी असल्याने स्थानिकच परदेशातही डाळिंबाला मागणी वाढती आहे. काळगाव शिवारात थेट बांधावर खरेदी केली जात आहे. बांग्‍लादेशातील तीन व्यापाऱ्यांनी भामरे बंधूचा लिलाव पध्दतीने डाळिंब खरेदी केला. बांगला देशातील समशेर भाई व हैदरभाई हे व्यापारी खरेदी करत आहेत. सुमारे चारशे ते हजार ग्रॅम प्रती फळ वजन देत आहे. भगवा जातीच्या डाळिंबाने परदेशी व्यापाऱ्यांना भुरळ घातली. सुमारे सहा हेक्‍टर क्षेत्रात ही बाग सेंद्रीय पध्दतीने केली जात असून एकरी पाच लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याची माहिती कृषी भुषण संजय भामरे यांनी दिली. 

इतर शेतकऱ्यांना प्रेरणा
शेती परवडत नसल्याची रड नेहमी शेतकरी करतान दिसतात. इतर पारंपारिक शेती तोट्यात असली तरी फळ पिक शेती मात्र आर्थिक उभारी देत असल्याचे चित्र आहे. काळगावच्या डाळिंबाचा डंका नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यासह परदेशातही वाजतोय; याचा परिपाक म्हणून युवा शेतकरी प्रेरीत होऊन भेट देत आहेत. नितिन ठाकरे, नरेंद्र भामरे, पठाण सोनवणे, बाजीराव ठाकरे, हेमंत ठाकरे, नरेंद्र ठाकरे, संदिप भामरे, सुनील भामरे, गिरीश भामरे, योगेश भामरे आदींनी बागेला भेट देत फळ शेती करण्याचा संकल्प केला. 

डाळिंबच काय प्रत्येक शेती माल शेताच्या बांधावर खरेदी झाला पाहिजे. तसा माल दर्जेदार ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्ष करणे आवश्यक आहे. शेती माल बांधावर खरेदी झाला तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास दर वाढेल.
- संजय भामरे, कृषीभुषण, काळगाव

संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Pomegranate dispatch in farm on bangaladesh tread