ती बँकेतील कर्मचारी तरी ऑनलाईनवर फसली

निखिल सूर्यवंशी
Thursday, 30 July 2020

आईच्या नावे ॲक्सिस बँकेतील ठेव आणि बचत खात्यातील शिल्लक रकमेतून तब्बल आठ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. नंतर प्रीतीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला.

धुळे : व्हेरिफिकेशन कॉलच्या बतावणीतून ओटीपी नंबर मिळवत मुंबईच्या ठकसेनने येथील खासगी बँकेतील तरुणीच्या सहाय्याने तिच्याच आईच्या खात्यातील साडेआठ लाख लांबविले. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
नकाणे रोड परिसरात आदर्श कॉलनीतील प्रीती कोठावदे (वय २३) हिला २६ जुलैला सकाळी अकराला ८९१८७ ९८६०२ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क झाला. मोबाईलधारकाने दीपक शर्मा (रा. वांद्रा, मुंबई) असे नाव सांगितले. त्याने व्हेरिफिकेशन कॉल असल्याची बतावणी करत प्रीतीला तिच्या मोबाईलवरील ओटीपी नंबरची मागणी केली. प्रीतीने तो नंबर शर्माला दिला. त्यामुळे या ठकसेनचे काम सोपे झाले. त्याने प्रीतीच्या आईच्या नावे ॲक्सिस बँकेतील ठेव आणि बचत खात्यातील शिल्लक रकमेतून तब्बल आठ लाख ४४ हजार रुपये काढून घेतले. नंतर प्रीतीच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. तिला या प्रकाराचा धक्का बसला. तिला ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने संशयित दीपक शर्माविरुद्ध फिर्याद दिली. पश्‍चिम देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी सांगितले, की तक्रारदार तरुणी खासगी बँकेत नोकरीला आहे. बँक कुठल्याही खातेदाराला स्व-खात्याविषयी माहिती विचारत नसते. तरीही संबंधित तरुणीने संशयित शर्मावर विश्‍वास ठेवत त्याला ओटीपी नंबर दिला व तिची फसवणूक झाली. फिर्यादीत नमूद मोबाईल नंबर आता बंद आहे. त्यामुळे तपासात अडसर आहे. मात्र, गुन्ह्याचा उलगडा केला जाईल. 
 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule private bank employee and otp online transection