अवाजवी बिलांवर आता भरारी पथकांचा ‘वॉच' 

रमाकांत घोडराज
Saturday, 29 August 2020

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत अनेक तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या.

धुळे : काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिल आकारण्याचे प्रकार होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शहरात अशी दोन पथके नियुक्त करण्यात आली असून ही पथके खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांकडून वाजवी शुल्क आकारणे तसेच रुग्णवाहिकांकडूनही वाजवी शुल्क आकारण्याबाबत अंमलबजावणी व तपासणी करतील. या पथकांच्या नियुक्तीमुळे अवाजवी बिल आकारण्याच्या प्रकाराला चाप बसेल अशी अपेक्षा आहे. 

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्याबाबत अनेक तक्रारी शासन स्तरावर प्राप्त झाल्या. याबाबत उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने धुळे शहरात दोन भरारी पथके नियुक्त केली. 

पथकांचे काम असे 
-सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याची खातरजमा करावी. (उदा. खासगी रुग्णालयांनी विविध उपचारांसाठी (कोविडबाधित व इतर रुग्ण) आकारावयाचे कमाल रुग्णालयाच्या दर्शनी भागावर रुग्ण व नातेवाइकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे आवश्यक आहे). 
-रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम करण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे तपासणी यंत्रणेने आकारले जाणारे दर, खासगी वाहने/ रुग्णवाहिका यांचेकडुन आकारले जाणारे दर विहित आहेत किंवा नाही याची तपासणी करावी. 
-अवाजवी बिल आकारण्याचा प्रकार निदर्शनास आल्यास पथकाने विनाविलंब संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच दररोज आयुक्तांना याबाबत माहिती द्यावी. 
-महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व खासगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे अपेक्षित आहे, याबाबतही ही पथके तपासणी करून तसा अहवाल तीन दिवसात सादर करावा असा आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांनी काढला आहे. आदेशाचे पालन बंधनकारक असून यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, नियमानुसार कारवाई केली जाईल असा इशाराही या आदेशाद्वारे देण्यात आला आहे. 
 
शहर विभाग पथक ः साहाय्यक आयुक्त विनायक कोते (नोडल अधिकारी-८२८५४५१८२२), साहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी दि. शा. अवसरमल (अध्यक्ष-९२२६७७८४६३), वरिष्ठ लेखापरीक्षक र. श. भुजबळ (सचिव-९४०५३१०३३७), कनिष्ठ लेखापरीक्षक स्व. वि. पवार (सदस्य-९९२२०१४४५५), कनिष्ठ लेखापरीक्षक न. प्र. शिंदे (९४२२४४६६०६), प्रभारी लेखाधिकारी प्रदीप नाईक (९४२२२९६२०३), लिपिक अभिजित पंचभाई (९४०४५७४९४५), फार्मासिस्ट सुनील माकडे. 

देवपूर विभाग पथक ः साहाय्यक आयुक्त तुषार नेरकर (नोडल अधिकारी-८८३०१५५२१६), साहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी भ. बु. कोळपे (अध्यक्ष-९८६०८४०६०१), वरिष्ठ लेखापरीक्षक श. शि. शिरसाट (सचिव-९४२१५३२०९४), कनिष्ठ लेखापरीक्षक नि. श. जावळे (सदस्य-९४२३१५२३९६), कनिष्ठ लेखापरीक्षक वि.म. पेंढारकर (८६८९९४७९९९), भांडारपाल राजेंद्र माईनकर (९४२२७८६४०२), लिपिक गणेश काकडे (९८८१२६३०८१) 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule private hospital bill corona patient watch bharari pathak