पेरेजपूर येथे ढगफुटी सदृश परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

साक्री : पेरेजपूर (ता.साक्री) येथे आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला असून, अवघ्या काही तासात 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने या भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या जोरदार पावसाने पेरेजपूर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, कांदा चाळींमध्ये देखील पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान साक्री शहरासह तालुक्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्याने शहरालगत वाहणाऱ्या सर्वच नाल्यांना पूर आला आहे.

साक्री : पेरेजपूर (ता.साक्री) येथे आज सकाळपासून जोरदार पाऊस झाला असून, अवघ्या काही तासात 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने या भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या जोरदार पावसाने पेरेजपूर परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, कांदा चाळींमध्ये देखील पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान साक्री शहरासह तालुक्यात गेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्याने शहरालगत वाहणाऱ्या सर्वच नाल्यांना पूर आला आहे. तसेच या पुरामुळे कान नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून, पहिल्याच पावसात सर्वत्र नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या पावसाने गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात जोरदार हजेरी लागली आहे. यातच काल (ता.23) पासून पेरेजपूर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या काही तासातच या भागात 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, या भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या भागातील नाल्यांना मोठा पूर आल्याने हे सर्व पाणी परिसरातील शेतांमध्ये शिरले असून, यामुळे शेतीचे मोठे नुकसान या भागात झाले आहे. तसेच हे पाणी शेतांमधील कांदा चाळीत देखील शिरल्याने या कांदा चाळींचे व साठवलेल्या कांद्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पेरेजपूर भागात जोरदार पाऊस होवून शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार संदीप भोसले यांनी स्वता जावून या भागाची पाहणी केली. जोरदार पावसाने शेतीचे व शेतमालाचे मोठे नुकसान झाले असले तरी मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी याठिकाणी झालेली नाही.

दरम्यान गेल्या 24 तासात साक्री महसूल मंडळात 60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या जोरदार पावसाने साक्री शहरातून वाहणाऱ्या सर्वच नाल्यांना मोठा पूर आला आहे. शहराच्या उत्तरेला असलेल्या पेरेजपूर, सालटेक, काशिदरा, अंबापूर आदि भागातील डोंगरांवर जोरदार पाऊस झाल्याने या नाल्यांना मोठा पूर आला आहे. तसेच शहरालगत वाहणाऱ्या कान नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून, नुकतेच नदीचे लोकसहभागातून स्वच्छता व खोलीकरण करण्यात आल्यानंतर विस्तारलेल्या नदी पात्रात पाणी आल्याने नदी पात्र अतिशय मोहक दिसत आहे. दरम्यान पेरेजपूर, सालटेक भागात जोरदार पाऊस झाल्याने नवापूर रोड वरील विमलबाई पाटील महाविद्यालयालगतच्या नाल्याला मोठा पूर आला आहे. हे पाणी थेट लगतच्या श्रीरंग कॉलनी आणि परिसरातील कॉलनी परिसरात शिरले होते. दरम्यान या नाल्यालगत अतिक्रमण करून त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या विमलबाई पाटील महाविद्यालयाचे बेकायदेशीरपणे काम सुरु असल्याने या नाल्याचा प्रवाह बदलत असून, यामुळेच हे पाणी कॉलनी परिसरात शिरत असल्याचा आरोप श्रीरंग कॉलनीतील रहिवासी डॉ.डी.पी.पाटील यांनी यावेळी केला. या संदर्भात आपण 2012 मध्येच रीतसर तक्रार केली असून, या संदर्भात सध्या न्यायालयीन लढा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: marathi news dhule sakri dhagphuti